अरुण जेटली यांच्याकडे सर्वाधिक रोख रक्कम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

केवळ चाळीस मंत्र्यांकडूनसंपत्तीची माहिती जाहीर

नवी दिल्ली -  मंत्र्यांसाठी असलेल्या आचारसंहितेनुसार, प्रत्येक मंत्र्याने दर वर्षी त्यांच्या संपत्तीची आणि आर्थिक व्यवहारांची माहिती पंतप्रधान कार्यालयाला देणे आवश्‍यक आहे. राष्ट्रकुल संघटनेच्या मानवाधिकार विभागाने जमा केलेल्या माहितीनुसार, केंद्रातील 76 मंत्र्यांपैकी केवळ 40 मंत्र्यांनी त्यांच्याजवळ असलेली रोख रक्कम जाहीर केली आहे.

केंद्र सरकार आपल्या खासदारांकडून पारदर्शी कारभाराची अपेक्षा करत असताना आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर सामान्य नागरिक बॅंकांसमोर रांगा लावत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही माहिती उघड झाली आहे. अनेक मंत्र्यांकडे 31 मार्च 2016 पूर्वी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम होती, असे या अहवालात दिसून आले आहे.

या अहवालानुसार, आतापर्यंत माहिती जाहीर केलेल्या मंत्र्यांपैकी सर्वाधिक रोख रक्कम अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे 65 लाख रुपये रोख असून, दुसऱ्या क्रमांकावर असलेले आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे 22 लाख रुपये रोख आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याकडे दहा लाख रुपये रोख असून, या यादीत ते तिसरे आहेत.

या मंत्र्यांपैकी 23 जणांकडे दोन लाखांहून कमी रोख रक्कम असून, 15 जणांकडे अडीच लाखांहून अधिक रुपये रोख स्वरूपात आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याकडील संपत्ती जाहीर केली असून, त्यांच्याकडे 89,700 रुपये रोख आहेत. वाहतूकमंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, जलस्रोतमंत्री उमा भारती यांनी अद्यापही आचारसंहितेनुसार त्यांच्या संपत्तीची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे जमा केलेली नाही.
 
Web Title: arun jaitley holds a larger amount in hand