जेटलींना झाले आणीबाणीचे स्मरण ! 

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

दरवर्षी 25 जून हा दिवस आला रे आला की लालकृष्ण अडवानींकडून हमखास एक "आणीबाणी स्मरण रंजना'ची बातमी मिळणे याची सवय दिल्लीत भाजपचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना झाली होती.... मात्र आता या स्मरणरंजनासाठी अडगळीत गेलेल्या अडवानींची जागा भाजपचेच दुसरे नेते व केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी घेतल्याचे दिसते. जेटलींनी आज एक फेसबुक लेखाद्वारे, कॉंग्रेसच्या तत्कालीन नेत्या इंदिरा गांधींनी एका दूरध्वनीवर आणीबाणी लादून लोकशाहीचे हुकूमशाहीत रूपांतर केले, असा वार केला आहे. 

नवी दिल्ली - दरवर्षी 25 जून हा दिवस आला रे आला की लालकृष्ण अडवानींकडून हमखास एक "आणीबाणी स्मरण रंजना'ची बातमी मिळणे याची सवय दिल्लीत भाजपचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना झाली होती.... मात्र आता या स्मरणरंजनासाठी अडगळीत गेलेल्या अडवानींची जागा भाजपचेच दुसरे नेते व केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी घेतल्याचे दिसते. जेटलींनी आज एक फेसबुक लेखाद्वारे, कॉंग्रेसच्या तत्कालीन नेत्या इंदिरा गांधींनी एका दूरध्वनीवर आणीबाणी लादून लोकशाहीचे हुकूमशाहीत रूपांतर केले, असा वार केला आहे. 

1977 पासून आजतागायत प्रथम जनसंघ व नंतर भाजप दरवर्षी 25 जून हा काळा दिवस म्हणून पाळतात. 21 महिन्यांच्या आणीबाणीत तुरुंगात गेलेल्या दिल्लीच्या अभाविप नेत्यांपैकी एक असलेल्या जेटलींनी त्याच्याच आठवणींना उजाळा दिला आहे. सध्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर एका प्रकारे अज्ञातवासात गेलेले जेटली सध्या काही घडले की लेखणी सरसावतात असे चित्र आहे. देशाचे अर्थखाते नेमके कोण हाताळत आहे, याबाबत माध्यमांत संभ्रम असला तरी जेटलींची लेखणी मात्र तळपत आहे. 

त्यांनी आज लिहिलेल्या लेखात आणीबाणीच्या दिवसांत कॉंग्रेसने लोकशाहीच्या कशा चिंध्या केल्या त्याचे वर्णन आहे. आणीबाणीच्या भाजपच्या आठवणी नव्या नाहीत मात्र आज त्यांना "जेटली टच' मिळाला आहे. केंद्र व राज्यांतही प्रचंड बहुमत असलेल्या कॉंग्रेसने इंदिरा गांधी सरकारच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन झाले होते, असे सांगून जेटलींनी म्हटले आहे की स्थिर व विकासाभिमुख धोरणांपेक्षा इंदिरा गांधींनी लोकप्रिय घोषणांवर भर दिला. त्यांनी स्वतःही नंतर आणीबाणीचे वर्णन "स्वतंत्र भारतातील सर्वांत काळा काळ,' असे केल्याचेही जेटलींनी कबूल केले आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीत प्रसार माध्यमांनाही सोडले नाही असे सांगून जेटलींनी म्हटले आहे की वृत्तपत्रांच्या बातम्याच नव्हे, तर जाहिरातींच्या प्रमाणावरही निर्बंध घातले गेले. काही आघाडीची वृत्तपत्रे सर्वोच्च न्यायालयात गेली तेव्हा तो वादग्रस्त आदेश न्यायालयाने फिरविला. आपण तेव्हा 22 वर्षांचे होतो असे सांगून ते म्हणतात की त्या वेळी अटक होणे वगैरेची इतकी जाणीवही नव्हती. पण त्या अटकेने माझे जीवनच बदलून गेले. तत्कालीन वरिष्ठ मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संसदीय भाषणाचे दाखलेही जेटलींनी दिले आहेत. 

Web Title: arun Jaitley Remindering Emergency