आम्हाला नको 'ईव्हीएम'; मतपत्रिकाच वापरा : केजरीवाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

दिल्ली महापालिकेची निवडणूक मतपत्रिकांद्वारेच घेतली जावी, अशी मागणी 'आप'ने निवडणूक आयोगाकडे केली आहे. कॉंग्रेसचे दिल्लीतील नेते अजय माकन यांनीही आगामी निवडणुकीसाठी 'ईव्हीएम' वापरू नये, अशी विनंती केजरीवाल यांना केली होती

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील निवडणुकीमध्ये 'ईव्हीएम'मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप मायावती यांनी केल्यानंतर आता 'आम आदमी पार्टी'चे (आप) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही 'ईव्हीएम'विरोधी भूमिका घेतली आहे. दिल्ली महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये 'ईव्हीएम'ऐवजी पूर्वीची मतपत्रिकांची पद्धत वापरावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. 

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत बहुमत मिळाले आहे. या विजयाच्या विरोधात बहुतांश विरोधी पक्षांनी 'ईव्हीएम' रद्द करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपचा विजय झाल्यानंतरही स्थानिक विरोधकांनीही हीच मागणी केली होती. 'उत्तर प्रदेशमध्ये भाजपने 'ईव्हीएम'मध्ये गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करावी,' अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी शनिवारी केली होती. 

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच 'आप'ने आता 'ईव्हीएम'विरोधात भूमिका घेतली आहे. यासंदर्भात मुख्य सचिव एम. एम. कुट्टी यांना निवडणूक आयोगाकडे रितसर पत्र पाठविण्याचे आदेश केजरीवाल यांनी दिले. दिल्ली महापालिकेची निवडणूक मतपत्रिकांद्वारेच घेतली जावी, अशी मागणी 'आप'ने निवडणूक आयोगाकडे केली आहे. कॉंग्रेसचे दिल्लीतील नेते अजय माकन यांनीही आगामी निवडणुकीसाठी 'ईव्हीएम' वापरू नये, अशी विनंती केजरीवाल यांना केली होती. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 'आप'ला पंजाब आणि गोव्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, पंजाबमध्ये त्यांना प्रभावी कामगिरी करता आली नाही आणि गोव्यात खातेही उघडता आले नाही. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्याकडून पराभव झालेले 'आप'चे नेते जर्नेलसिंग म्हणाले, "आम्हाला आमचा पराभव मान्य आहे. पण पंजाबमधील निकालाविषयी आम्हाला शंका आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 'आप'चे जितके कार्यकर्ते आहेत, त्याहीपेक्षा कमी मते मिळाली आहेत.''

Web Title: Arvind Kejriwal opposes use of EVMs in MCD polls