केजरीवाल स्वतः आपल्याच जाळ्यात फसले ?

kejriwal
kejriwal

आम आदमी पक्षात माफी सत्र सुरु आहे. आणखी काही दिवस ते सुरु राहील अशीच शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आपल्याच सापळ्यात फ़सलेले आहेत. काही वर्षापूर्वी भारतीय राजकारणाची दिशा व परिस्थिती बदलण्यासाठी जन्म घेतलेल्या या पक्षाची अवस्था, अन्य कुठल्याही भ्रष्ट वा नाकर्त्या पक्षापेक्षाही वाईट झाली आहे. अण्णा हजारे, रामदेवबाबा, किरण बेदी, भूषण पिता-पुत्र आणि केजरीवाल अशी पंचकडी लोकपाल विधेयक व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून यूपीए-२ सरकारवर तुटून पडत होती. त्यांच्याकडून जागोजागी संसद सदस्यांची खुलेआम  टिंगलटवाळी केली जात होती. सर्व नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात होते. हे आरोप करण्यात केजरीवाल हे अग्रभागी होते. त्यामधूनच आम आदमी पक्षाचा उदय झाला. अगदी सुरुवातीपासून केजरीवाल व त्यांच्या घोषणा व आश्वासनांचे आज काय झाले? ते त्यांनाही सांगता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. हायकमांड मनमानी हा राजकारणातला सर्वात घाणेरडा रोग असल्याचे सांगत पारदर्शी राजकारण करायला केजरीवाल आले. त्यांना आता हायकमांड या प्रतिमेतून बाहेर पडताना त्रास होतोय. दिल्लीत स्थान असलेल्या या पक्षाला पंजाबामध्ये सत्ता संपादन करणारच असा आत्मविश्वास होता. पण त्यांना अपेक्षित यश मिळले नाही. आता तर त्याही राज्यातली पक्षाची शाखा नेतृत्वाच्या विरोधात बंडाचा झेंडा घेऊन उभी राहिलेली आहे. कारण त्याच पंजाब प्रचाराच्या दरम्यान केजरीवाल यांनी केलेले आरोप अंगाशी आलेले आहेत. त्यातून वाचण्यासाठी त्यांनी चक्क माफ़िनामा लिहून दिला आहे. त्याच माफ़िनाम्याने पंजाबातील त्यांचे नेते,आमदार चिडलेले असून, त्यांनी पक्ष सोडण्याची सामुहिक धमकी दिलेली आहे. 

नोकरशाहीचा चांगला अनुभव असणारे आणि माहिती अधिकारासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा रॅमन मॅगेसेसे पुरस्कार मिळाल्याने केजरीवाल यांच्या सर्व आरोपांत तथ्य असल्याचा ग्रह जनतेने व मीडियाने करून घेतला होता. सामान्यांचे पाणी-वीज-घर-भ्रष्टाचार असे प्रश्न मांडणारा, नैतिकेची भूमिका मांडणारा व आदर्श राजकारणाविषयी सामान्यांच्या मनातील भावना मांडणारा नेता या देशाला अनेक तपांनी गवसला, असे वातावरण देशभर झाले होते. केजरीवाल आरोप करताना थेट नेत्यांची नावे घेत सनसनाटी निर्माण करत असत. त्याने त्यांची लोकप्रियता वाढत गेली, त्या बळावर त्यांनी आम आदमी पक्ष स्थापन करून दिल्ली विधानसभा निवडणुकांत भाजप व काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांना धूळ चारली. निवडणुकीच्या अशा यशामुळे केजरीवाल अधिक बेफिकीर झाले. आपणच नैतिकवादी राजकारणी, बाकीचे सगळे चोर अशा थाटात ते वागू लागले. पण या देशात प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, न्याय मागण्याचे स्वातंत्र्य आहे, प्रत्येक जण स्वत: स्वच्छ आहोत हे सिद्ध करू शकतो. केजरीवाल यांना हे कायदेशीर हक्क माहिती नसल्याने ते निर्धास्त होते, पण केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचे अरुण जेटली, नितीन गडकरी, काँग्रेसच्या शीला दीक्षित व पंजाबमधील माजी मंत्री मजिठिया यांनी मानहानीचे दावे दाखल केले तेव्हा कायद्याच्या पातळीवर आरोप सिद्ध करण्याची केजरीवाल यांच्यावर वेळ आली आणि ते पद्धतशीर अडकले गेले. आता चार वर्षांनंतर न्यायालयात आरोपांचे पुरावे देता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर केजरीवाल एकेकाला माफीनामे देत सुटले आहेत. 

आता माध्यमांमध्ये चर्चा सुरु आहे की तीन कारणांमुळे केरजरीवाल माफी मागत आहेत. माफी ही केजरीवाल यांच्या रणनीतीचा एक भाग आहे. कारण पार्टीमधील नेत्यांवरील मानहानीच्या दाव्यांमुळे ते पक्ष विस्ताराच्या कामांना वेळ देऊ शकत नाहीत. अशात एका वर्षावर लोकसभेची निवडणूक आहे. यातुन बाहेर पडून संघटना विस्तारावर लक्ष देण्यासाठी माफी मागावी लागली तरी चालेल असा निर्णय करण्यात आला आहे. दुसरे कारण म्हणजे मानहानीच्या खटल्यांमध्ये पुरावे नाही दिले तर जेलमध्ये जावे लागेल किंवा मोठी रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागेल. यामध्ये स्वतः केजरीवाल अडकले आणि जेलमध्ये गेले तर पार्टीला भविष्य नाही. तिसरे पार्टीला मिळणाऱ्या देणग्या कमी होत चालल्या आहेत. हे खटले लढण्यासाठी भरपूर पैशांची गरज आहे. त्यातच लोकसभा निवडणूक जवळ आल्याने त्यासाठी पैसे लागणार आहेत. 

केजरीवाल माफी मागून या सर्व प्रकरणांतून सुटतीलही पण ज्या आरोपांवर त्यांनी लोकांच्या मनातील संताप बाहेर काढून सत्ता मिळवली त्या मतदारांपुढे आपण केलेले आरोप खोटे होते असे ते सांगतील का? केजरीवाल व त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या मते न्यायालयीन लढ्यात ऊर्जा खर्च करण्यापेक्षा ही ऊर्जा लोकहितासाठी राबवण्यासाठी हे माफीनामे आहेत. हा युक्तिवाद मानला तरी भविष्यात केजरीवाल अन्य पक्षांच्या नेत्यांवर आरोप करणार की नाहीत? राजकारणात विरोधकांची माफी मागणे ही दुर्मिळ बाब असली तरी या खेळामुळे नेत्याची राजकीय प्रतिमा ढासळते. मतदारांचा विश्वासही कमी होतो. केजरीवाल यांनी स्वत:ची प्रतिमा विश्वासार्ह व प्रामाणिक नेता अशी केली होती. आता त्यांची प्रतिमा ढासळण्यास सुरुवात होणार आहे. येणारा काळ त्यांच्यासाठी खूप खडतर असणार आहे. यातून बाहेर पडून पक्षाला सावरण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार हे मात्र नक्की.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com