नोट नहीं, पीएम बदलो - केजरीवाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

'मोदी यांच्या निर्णयामुळे 'पे-टीएम'च्या व्यवहारांत मोठी वाढ झाली. मोदी यांनी 'पे-टीएम'साठी जाहिरात केली. मोदी आणि 'पे-टीएम'मध्ये काय संबंध आहेत, हे त्यांनीच जाहीर करावे,' अशी मागणी केजरीवाल यांनी केली. त्यानंतर 'नोट नहीं, पीएम बदलो' असे ट्‌विटही त्यांनी केले.

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. "नोटा नाही, पंतप्रधानच बदला' असे ट्विट केजरीवाल यांनी आज (सोमवार) केले.

पाचशे-एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा मोदी यांनी केल्यापासून केजरीवाल यांनी विविध मुद्द्यांवरून त्यांना लक्ष्य केले आहे. हा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह मोर्चाही काढला होता. काळ्या पैशाचा मुद्दा केंद्रस्थानी घेत स्थापन झालेल्या "आप'ने उद्या (मंगळवार) जंतर मंतर ते संसद असा मोर्चा काढण्याची घोषणाही केली आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देशभरात प्लॅस्टिक मनी आणि "पेटीएम'सारख्या मोबाईल ऍप्लिकेशनचा वापरही वाढला आहे.

"पेटीएम'च्या एकूण व्यवहारांत दोनशे टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली आहे. यावरूनही केजरीवाल यांनी मोदी यांना लक्ष्य केले. 'मोदी यांच्या निर्णयामुळे "पेटीएम'च्या व्यवहारांत मोठी वाढ झाली. मोदी यांनी "पेटीएम'साठी जाहिरात केली. मोदी आणि "पेटीएम'मध्ये काय संबंध आहेत, हे त्यांनीच जाहीर करावे,'' अशी मागणी केजरीवाल यांनी केली. त्यानंतर "नोट नहीं, पीएम बदलो' असे ट्‌विटही त्यांनी केले.

"पेटीएम'च्या मुद्द्यावर ट्विट करत केजरीवाल यांनी गेल्या आठवड्यातही वाद निर्माण केला होता. त्या वेळी केजरीवाल आणि "पेटीएम'चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्यात ट्विटरवर वाद झाला होता. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा "पेटीएम'ला झाला आहे. नक्की काय व्यवहार झाला आहे, असा प्रश्‍न केजरीवाल यांनी उपस्थित केला होता. त्यावर, "या निर्णयाचा सर्वाधिक फायदा देशाला होणार आहे. आम्ही फक्त एक स्टार्ट अप कंपनी आहोत,' असे प्रत्युत्तर शर्मा यांनी दिले होते.

केजरीवाल, का त्रास करून घेताय? निर्णय बदलणार नाही; आपण बदला.
- रामेश्‍वर, वाचक

Web Title: Arvind Kejriwal targets PM Narendra Modi again on Demonitisation