esakal | मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींनी घेतला आक्षेप; केजरीवालांनी मागितली माफी

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींनी घेतला आक्षेप; केजरीवालांनी मागितली माफी
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींनी घेतला आक्षेप; केजरीवालांनी मागितली माफी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेतली. त्यांनी या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी देखील बातचित केली. मात्र, त्यांच्या या चर्चेचा व्हिडीओ टीव्हीवर लाईव्ह केला गेला आणि हा वादाचा मुद्दा ठरला. केंद्र सरकारने यावर टीका करताना म्हटलंय की, केजरीवाल यांनी राजकरण करण्यासाठी तसेच खोटं पसरवण्यासाठी या लाईव्हचा उपयोग केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हर्च्यूअल पद्धतीने बैठक घेतली. मात्र, या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका कृतीवर पंतप्रधान मोदी नाराज झाले आहेत. त्यांनी मीटिंगच्या दरम्यानच केजरीवाल यांना कडक शब्दांत सुनावलं आणि म्हटलं की, आपण एक खूपच महत्त्वाचा असा प्रोटोकॉल तोडला आहे. बैठकीतील खाजगी बातचितीचा कधीही प्रचार-प्रसार केला जात नाही. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी देखील पंतप्रधान मोदी यांची माफी मागितली आहे.

यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय की, आज मुख्यमंत्र्यांचं संबोधन लाईव्ह केलं गेलं कारण या बैठकीचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाऊ नये अशी कोणत्याही प्रकारची लिखित अथवा शाब्दिक सुचना केंद्र सरकारकडून देण्यात आली नव्हती. याआधी अशा अनेक बैठका लाईव्ह केल्या गेल्या आहेत. तरीही, झालेल्या तसदीबद्दल मी खेद व्यक्त करतो, असं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: 'मुख्यमंत्री असून हतबल'; केजरीवाल यांनी मोदींसमोर जोडले हात

हेही वाचा: 22 एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन; असे असतील नवे निर्बंध

नेमकं काय घडलं?

केजरीवाल जेंव्हा पुढे बोलत होते तेंव्हा पंतप्रधान मोदी यांनी त्यांना टोकत म्हटलं की, ही जी आपली परंपरा आहे, आपला प्रोटोकॉल आहे, त्याच्या हे विरोधात होत आहे. कुठलाही मुख्यमंत्री अशा इनहाऊस मिटींगच लाईव्ह टेलिकास्ट करु शकत नाही. हे योग्य नाहीये. आपल्याला नेहमीच संयमाचं पालन करायला हवं. यावर केजरीवाल यांनी मान्य केलं की त्यांच्याकडून चूक झालीय. त्यावर पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, ठिक आहे. इथून पुढे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यावर केजरीवाल यांनी म्हटलं की, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल, मी काही कठोर शब्द वापरले असतील अथवा आचरणात काही चूक झाली असेल तर मी त्यासाठी माफी मागतो.

केजरीवाल यांनी बैठकीत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे

दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये काही तासच पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा शिल्लक असल्याने ऑक्सिजनचा लवकरात लवकर पुरवठा करावा, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत केली. ही मागणी करताना केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींसमोर हात जोडले. ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या ट्रकची अडवणूक केली जात आहे. मुख्यमंत्री असूनही मी काही करू शकत नाही. पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. जर काही अनुचित प्रकार घडला तर आम्ही स्वत:ला माफ करू शकणार नाही, असेही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय योजना बनवायला हवी. त्याअंतर्गत देशातील ऑक्सिजनचे सर्व कारखाने सैन्याच्या ताब्यात द्यावेत. प्रत्येक ट्रकसोबत सैन्याचं एक एस्कॉर्ट वाहन असेल, तर कुणीही ते ट्रक अडवणार नाहीत. ओडिशा आणि पश्चिम बंगालमधून १०० टन ऑक्सिजन येणार आहे, आम्ही तो दिल्लीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शक्य असेल तर ऑक्सिजनची वाहतूक विमानाने करावी किंवा ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे दिल्लीला ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, असेही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.