केजरीवालांच्या नातेवाइकाला अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 मे 2018

सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहार प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पथकाने (एसीबी) आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका नातेवाइकाला अटक केली. हा केजरीवालांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली आहे.

नवी दिल्ली : सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहार प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पथकाने (एसीबी) आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका नातेवाइकाला अटक केली. हा केजरीवालांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली आहे.

केजरीवाल यांचा भाचा विनय बन्सल यांना "एसीबी'ने आज सकाळी अटक केली. "एसीबी'ने गेल्या वर्षी नऊ मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहार प्रकरणी तीन गुन्हे दाखल केले असून त्यातील एका गुन्हा केजरीवाल यांचे मेहुणे सुरेंदर बन्सल यांच्या कंपनीविरोधात आहे. "रोड्‌स अँडिकरप्शन ऑर्गनायझेशन' या संघटनेचे संस्थापक राहुल शर्मा यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

केजरीवालांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत बन्सल यांना कंत्राटे मिळवून दिली, असा शर्मा यांचा आरोप आहे. बन्सल यांनी इमारतींच्या ड्रेनेज यंत्रणेच्या बांधकामात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा शर्मा यांचा आरोप आहे. तसेच, बन्सल यांच्या कंपनीने अपूर्ण कामांचेही पैसे राज्य सरकारकडून उकळले, असाही आरोप आहे.

"आप'ने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. गेल्या तीन वर्षांत दिल्ली पोलिस आणि "एसीबी'ने केवळ केंद्र सरकार आणि नायब राज्यपालांसाठी काम करत आप नेते आणि त्यांच्या नातेवाइकांना त्रास दिला आहे, अशी टीका दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सीसोदिया यांनी केली आहे. "एसीबी'ने मात्र अटकेचे समर्थन केले आहे. 

Web Title: Arvind Kejriwal's Relative Vinay Bansal Arrested In A Corruption Case