असदुद्दीन ओवेसी म्हणजे दुसरे जिना; मुनव्वर राणांची टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 13 November 2020

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणजे दुसरे जिना असल्याची टीका उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी केली आहे.

लखनौ- एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणजे दुसरे जिना असल्याची टीका उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी केली आहे. ओवेसी सारख्या नेत्यांनीच मुस्लिमांना विभागल्याचेही ते म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राणा यांनी ओवेसी यांच्यावर टीका केली आहे. ओवेसी यांच्या एमआयएमने पाच जागा जिंकल्या. तसेच त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या मतांमध्ये विभाजन घडवून आणले असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. ओवेसी यांनी मतांचे विभाजन केले असले तरी मुस्लीम समाज अजून एक जिना निर्माण होऊ देणार नाही, असे राणा यांनी एका दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

VIDEO: पाकच्या कुरापतीला भारताचे जोरदार प्रत्युत्तर; 8 सैनिकांचा खात्मा

ओवेसी हे भाजपसाठी काम करत असल्याचा आरोपही मुनव्वर राणा यांनी केला. “ओवेसी मुस्लिमांची मते विभागतात त्याचा फायदा भाजपला होतो,” असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, “ओवेसी भाजपचे दलाल असून नेहमीच मतांचे विभाजन करण्याचे काम करतात. असदुद्दीन आणि अकबरुद्दीन हे दोघे भाऊ मुस्लिमांना आणि खासकरून तरुणांना भरकवटत असतात. आपली १५ हजार कोटींची संपत्ती वाचवण्यासाठी ते मुस्लिमांच्या मतांचे विभाजन करून ते थेट भाजपला मदत करतात”
“बिहारमध्ये पाच जागा जिंकून ते मुस्लिमांना कोणता न्याय देणार आहेत? असदुद्दीन यांच्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहार ही फायद्याची ठिकाणे आहेत. उत्तर प्रदेशात जेव्हा कधी जातीय तणाव निर्माण होतो तेव्हा ओवेसी हैदराबादमध्ये लपतात,” असा आरोप राणा यांनी केला आहे. मुनव्वर राणा हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी असून, त्यांनी २०१५मध्ये आपला पुरस्कार परत केला होता.

असदुद्दीन ओवेसी आता पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम मतांचे विभाजन करण्यासाठीच जात आहेत. तर अमित शहा हे हिंदू मतांचे विभाजन करतील, असं उर्दू कवी मुनव्वर राणा म्हणाले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asaduddin Owaisi is the second jinna Criticism of Munavvar Rana