आसाराम बलात्कारी; जोधपूर कोर्टाचा निकाल

वृत्तसंस्था
बुधवार, 25 एप्रिल 2018

आम्ही आमच्या वकिलांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतरच पुढील पावले उचलली जातील. आम्हाला देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.

-  नीलम दुबे, आसारामबापूच्या प्रवक्त्या

जोधपूर : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर झाला झाला. आसारामबापूसह तीन आरोपी दोषी व दोघांना निर्दोष सुनावण्यात आले आहे. 

आसाराम, शिल्पी व शरद हे तिघे या प्रकरणात दोषी ठरवले गेले, तर शिवा आणि प्रकाश हे दोघे निर्दोष असल्याचा निर्णय जोधपूर सत्र न्यायालयाने दिला आहे. 

निकाल सुनावल्यानंतर आसारामबापूच्या प्रवक्त्या नीलम दुबे यांनी, आम्ही आमच्या वकिलांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतरच पुढील पावले उचलली जातील. आम्हाला देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे सांगितले.

'आसाराम दोषी ठरला आहे. आम्हाला न्याय मिळाला. या लढ्यामध्ये आम्हाला पाठिंबा देणार्‍या सर्वांचे आभार! या प्रकरणातील साक्षीदारांचीही हत्या झाली; त्यांनाही न्याय मिळाला. आता आसाराम बापूला कठोर शिक्षा होईल, अशी आशा आहे.' अशी भावना अत्याचारग्रस्त मुलीचे वडिलांनी व्यक्त केली.

या निकालामुळे आज राजस्थान, गुजरात, हरयाणा व उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आसारामची भक्तमंडळी व अनुयायी या चार राज्यात मोठ्या प्रमाणात असल्याने गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

2013 मध्ये जोधपूर जवळील आसारामच्या आश्रमात एका उत्तर प्रदेशातील 16 वर्षीय मुलीवर बलात्कार व अत्याचाराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार, जोधपूर विशेष न्यायालय मध्यवर्ती कारागृहाच्या भागातच हा निकाल जाहीर केला गेला. 

Web Title: Asaram found guilty in rape case