आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी सन्मान

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नवी दिल्ली : ग्रामीण जीवनाचा अस्सल अनुभव मांडणारे व गतकाळाचे गौरवीकरण न करता "आज व आत्ता'ला साक्षात भिडून लेखन करणारे आसाराम लोमटे यांना प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी सन्मान-2016 जाहीर झाला आहे. लोमटे यांच्या "आलोक' या कथासंग्रहाची निवड यासाठी करण्यात आली. एकूण 24 भाषांतील साहित्यिकांना यंदा अकादमी पुरस्कार मिळाल्याची घोषणा साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी आज केली. एक लाख रुपये रोख, ताम्रपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून, पुढच्या वर्षी 22 फेब्रुवारीला दिल्लीत पारंपरिक पद्धतीने पुरस्कार वितरण होईल. लोमटे यांच्याबरोबरच कोकणीसाठी एडविन जे. एफ. डिसोझा यांना "काळे भांगार' या कादंबरीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.

तरुण पिढीत ग्रामीण साहित्याचा ठसा उमटविणारे लोमटे यांचा "आलोक' कथासंग्रह 2010 मध्ये प्रकाशित झाला. गतवर्षी त्याची दुसरी आवृत्ती निघाली. लोमटे यांच्या लेखनाबद्दल भा. ल. भोळे व म. द. हातकणंगलेकर यांच्यासारख्या दिग्गजांनी कौतुकौद्गार काढले आहेत. राव यांनी सांगितले की, यंदाच्या विजेत्यांत आठ कवितासंग्रह, सात कथासंग्रह, पाच कादंबऱ्या, दोन समीक्षा, 11 निबंध संग्रह व एक नाटक या पुरस्कारासाठी पात्र ठरले आहे. मराठी साहित्यकृतीची निवड करणाऱ्या ज्यूरींच्या मंडळात डॉ. गंगाधर पानतावणे, मनोहर जाधव व डॉ. चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता. कोकणी पुस्तकाची निवड मीना काकोडकर, नागेश करमाली व शरदचंद्र शेणॉय यांनी केली.

अन्य पुरस्कार विजेते
आज जाहीर झालेले अकादमी पुरस्कार विजेते असे - इंग्रजी - जेरी पिंटो, हिंदी- नासिरा शर्मा, संस्कृत- सीतानाथ आचार्य शास्त्री, आसामी- ज्ञान पुजारी, बंगाली- नृसिंह प्रससाद भादुरी, बोडो- अंजू नार्जारी, डोगरी- छत्रपाल, गुजराती- कमल वोरा, कन्नड- बोलवार महंमद कुट्टी, काश्‍मिरी- अजीज हाजिनी, मैथिली- श्‍याम दरिहरे, मल्याळम- प्रभा वर्मा, मणिपुरी- मोइराथेम राजेन, नेपाळी- गीता उपाध्याय, ओडिया- परमिता सत्पथी, पंजाबी- स्वराजबीर, राजस्थानी- बलाकी शर्मा, संथाली- गोविंदचंद्र माझी, सिंधी- नंद जावेरी, तमिळ- वन्नदासन, तेलगू- पापिनेनी शिवशंकर, उर्दू- निजाम सिद्दिकी.

धनादेश परत घेण्याचा प्रश्‍नच नाही
मोदी सरकार आल्यावर सुरू झालेल्या पुरस्कार वापसीमुळे चर्चेत आलेल्या साहित्य अकादमीने परत आलेले धनादेश बॅंकेत टाकलेलेच नसल्याने ते परत घेण्याचा प्रश्‍नच उद्‌भव नसल्याचे राव यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की यंदा अकादमीने देशविदेशांत सुमारे साडेपाचशे साहित्यिक कार्यक्रम घेतले. सुमारे 400 पुस्तकांचे प्रकाशन झाले व पुस्तक विक्रीतून अकादमीला दोन कोटी रुपयांचा निधी मिळाला. दोन ऑक्‍टोबरपासून सुरू झालेला ग्रामलोक या कार्यक्रमाला देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. यानंतर अकादमीतर्फे आदिवासी लेखन कार्यशाळा आदिवासी भागात आयोजित केल्या जातील व त्यासाठी नामवंत लेखकांचे सहाय्य घेतले जाईल, असेही राव म्हणाले.

देश महासत्तेच्या दिशेने जात आहे. झगमगत्या दुनियेत शेवटचा वंचित माणूस कमालीचा दबलेला व अस्वस्थ आहे. अशा उपेक्षितांच्या जगण्यातील ताण-तणाव, आशा-आकांक्षा टिपण्याचा प्रयत्न साहित्यातून केला आहे. साहित्य अकादमी पुरस्काराने उपेक्षितांवरील लिखाणाचा गौरव झाला आहे.
- डॉ. आसाराम लोमटे

Web Title: asaram lomte wins sahitya akademy