मुख्यमंत्री म्हणून गेहलोत तर, उपमुख्यमंत्री म्हणून पायलट यांनी घेतली शपथ

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची तर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आज (दि.17) शपथ घेतली. राज्यपाल कल्याण सिंह यांनी या दोघांनाही पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गेहलोत हे तिसऱ्यांदा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

जयपूर - अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची तर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आज (दि.17) शपथ घेतली. राज्यपाल कल्याण सिंह यांनी या दोघांनाही पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गेहलोत हे तिसऱ्यांदा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा आज पार पडला. सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, जतीन प्रसाद, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याबरोबरच देशभरातील विरोधीपक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये राजदचे नेते तेजस्वी यादव, शरद यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार, नॅशनल काॅन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला काथ्याकूट काल संपला. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधींच्या उपस्थितीत काल दोन्ही नेत्यांशी चर्चा केली होती. अपेक्षित तोडगा न निघाल्यामुळे रात्री पुन्हा एकदा उशिरा दोन्ही नेत्यांना राहुल गांधींनी स्वतंत्रपणे बोलावून घेतले होते.

मध्य प्रदेश आणि राजस्थान ही हिंदी भाषक पट्ट्यातील महत्त्वाची राज्ये असल्यामुळे किमान एका ठिकाणी तरी मुख्यमंत्रिपद तरुण नेतृत्वाकडे असावे, अशी आग्रही सूचना प्रियांका गांधींकडून आली होती. मात्र, राजस्थानातील परिस्थिती पाहता गेहलोत यांना पर्याय नसल्यामुळे सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, असा प्रस्ताव पुढे करण्यात आला. याशिवाय सोबतच "भविष्यात योग्य काळजी घेतली जाईल' असे आश्‍वासनही देण्यात आल्यानंतर पायलट यांनी होकार दिला.

Web Title: Ashok Gehlot Takes Oath As The Chief Minister And Sachin Pilot Takes Oath As The Deputy Chief Minister Of Rajasthan