CAA साठी मोदींना म्हणायचा देव; 'भारतीय' नागरिक होण्याची शेवटची इच्छा राहिली अपुरीच

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 December 2020

'विदेशी' असण्याचा ठप्पा हटण्याची आस लावून बसलेल्या 104 वर्षीय चंद्रधर दास यांचे रविवारी हृदयरोगाने निधन झाले.

गुवाहाटी : आसाममध्ये सुधारित नागरिकत्व कायदा लागू होण्याची आणि स्वत:वरुन विदेशी असण्याचा ठप्पा हटण्याची आस लावून बसलेल्या 104 वर्षीय चंद्रधर दास यांचे रविवारी हृदयरोगाने निधन झाले. दोन वर्षांपूर्वी त्यांना विदेशी लोकांसाठी बनवल्या गेलेल्या डिटेंशन कँपमध्ये ठेवलं गेलं होतं. या ठिकाणी त्यांनी तीन महिने काढले होते. यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून ते हृदयरोगाच्या आजाराशी लढत होते आणि आता 'विदेशी' म्हणूनच त्यांचा मृत्यू झाला.

मोदी आमचे भगवान
दास यांची मुलगी न्युती दास त्या दिवसाची आठवण काढते जेंव्हा त्यांच्या भावाच्या फोनवर चंद्रधर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकत होते. त्यांचं भाषण ऐकत त्यांचे वडील हसत म्हणाले की, मोदी आपले भगवान आहेत. ते इथे नागरिकत्व कायद्याद्वारे सर्वांचे समाधान करतील. आपण सारे भारतीय होऊ. न्यूती यांनी सांगितलं की, त्यांच्या वडिलांना पहिल्यापासूनच ही आशा होती की, एके दिवशी त्यांना भारताचे नागरिकत्व प्राप्त होईल. त्यांना जिथे कुठे मोदींचे पोस्टर दिसायचे ते हात जोडून नमस्कार करायचे. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी त्यांच्यासाठी मोठी आशा होती. कायदा होऊन एक वर्ष झाले मात्र त्यांच्या भगवानने काय केलं? त्यांनी म्हटलं की, ते फक्त भारतीय होऊन मरु इच्छित होते. आम्ही खूप  प्रयत्न केले. कोर्टाच्या खस्ता खाल्ल्या. वकिलांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांना भेटलो. सगळी कागदपत्रे जमा केली. पण आता ते निघून गेले आहेत. आम्ही आजही कायद्याच्या दृष्टीने विदेशी आहोत. नागरिकत्व कायद्याने आमच्यासाठी काहीही केलं नाहीये.

हेही वाचा - संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द तर अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेआधीच

काँग्रेसने केला आरोप
चंद्रधर यांच्या मृत्यूवरुन राजकारण देखील तापलं आहे.  काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी दास यांच्या परिवाराची भेट घेतली आणि नागरिकत्व कायद्याला फक्त मतांच्या ध्रुवीकरणासाठी असलेलं साधन आहे, असं सांगितलं. त्यांनी आरोप देखील केला की, डिटेंशन कँपमध्ये पाठवल्या गेलेल्या हिंदू बंगाली लोकांची भाजपा मदत करत नाहीये.

 
काय आहे दास यांची कहानी
चंद्रधर दास यांचा मुलगा गौरांग यांनी सांगितलं की चंद्रधर दास त्यांना पूर्व पाकिस्तानमधून भारतात येण्यावेळचे अनुभव ऐकवायचे. तिथे खूप हत्या होत होत्या. म्हणून ते सीमा पार करुन भारतात त्रिपूरामध्ये आले होते. ही 50-60 च्या दशकातील गोष्ट असेल. त्रिपूरामधून दास कठीण प्रवास करुन आसाममध्ये आले होते. ते आपले पोट भरण्यासाठी लाडू विकायचे. अचानक एके दिवशी 2018 मध्ये अधिकाऱ्यांनी त्यांना घरातून उचललं आणि विदेशी लोकांसाठी बनलेल्या डिटेंशन कँपमध्ये टाकलं. जून 2018 मध्ये त्यांना जामीन मिळाला. मात्र त्यांच्या कुटुंबाची केस अद्याप कोर्टात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: assam 104 year old elderly man dies as foreigner hoping narendra modi solve his citizenship issue