esakal | सूनबाईची कामगिरी; पॉझिटिव्ह सासऱ्यांना पाठीवर घेऊन गाठलं कोविड सेंटर
sakal

बोलून बातमी शोधा

पॉझिटिव्ह सासऱ्यांना पाठीवर घेऊन गाठलं कोविड सेंटर

पॉझिटिव्ह सासऱ्यांना पाठीवर घेऊन गाठलं कोविड सेंटर

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना काळात समाजातील प्रत्येक व्यक्तीचे खरे चेहरे समोर आले आहेत. या संकटकाळात अनेक मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांची साथ सोडली. तर, काही मुलांनी आपल्या आई-वडिलांना वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. विशेष म्हणजे दरवेळी वृद्ध मातापित्यांवर अन्याय झाला की पहिला दोष सुनेला दिला जातो. मात्र, सध्या सोशल मीडियावर अशा सुनेची चर्चा रंगली आहे, जिचं कार्य पाहिलं तर अनेकांना तिचं कौतुक वाटेल. कोविड पॉझिटिव्ह असलेले सासऱ्यांचे प्राण वाचावेत यासाठी एका सुनेने त्यांना पाठीवर घेऊन थेट कोविड सेंटर गाठलं आहे. (assam-duaghter-in-law-niharika-das-carrying-covid-positive-father-in-law-on-back)

सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या महिलेचं नाव निहारिका दास असून त्या आसामच्या (assam) नगांव येथील रहिवासी आहेत. सध्या आदर्श सूनबाई अशी त्यांची सर्वत्र चर्चा रंगली आहे. आपल्या कोरोनाग्रस्त सासऱ्यांना निहारिकाने पाठीवर घेत दोन किलोमीटरचं अंतर पायी कापलं आहे. विशेष म्हणजे यावेळी तिच्या आजूबाजूचे लोक तिचे फोटो काढत होते. मात्र, कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे सरसावलं नाही.

हेही वाचा: जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचं वजन किती माहित आहे का?

निहारिका दास यांच्या सासऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना कोविड सेंटरमध्ये नेणं गरजेचं होतं. परंतु, यावेळी कोणीही निहारिकाच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. म्हणूनच, शेवटी निहारिकाने सासऱ्यांना पाठीवर उचलून घेत त्यांनी कोविड सेंटरपर्यंत नेलं. विशेष म्हणजे हे कोविड सेंटर २ किलोमीटर लांब असून हा प्रवास तिने एकटीने केला. मात्र, अथक प्रयत्न केल्यानंतरही सासऱ्यांचे प्राण वाचवण्यास ती अयशस्वी ठरली आणि तिलादेखील कोरोनाची लागण झाली.

निहारिका दास हिचे सासरे थुलेश्वर दास हे भाटिगांवमध्ये सुपारी विक्रेता होते. २ जून रोजी त्यांच्यात कोरोनाची लक्षण आढळून आली आणि नंतर हळूहळू प्रकृती खालावू लागली. त्यामुळे त्यांना कोविड सेंटरपर्यंत नेण्यासाठी निहारिकाने रिक्षाची सोय केली. मात्र, रिक्षा येईपर्यंत थुलेश्वर यांचा त्रास वाढू लागला. त्यातच घरातदेखील कोणीच नसल्यामुळे निहारिकाने सासऱ्यांना पाठीवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, निहारिकाने प्रयत्न करुनही तिच्या सासऱ्यांचे प्राण वाचवू शकली नाही.