आसाम-मिझोराम सीमेवर तणाव, हिंसाचारानंतर केंद्राने बोलावली बैठक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

हिसांचाराचे प्रकार दरवर्षी होतात, असे स्थानिक आमदार परिमल शुक्ला वैद्य यांनी सांगितले.

गुवाहाटी- आसाम आणि मिझोरामच्या नागरिकांमध्ये झालेल्या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत. दोन्ही राज्यांच्या सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह सचिव अजयकुमार भल्ला सोमवारी दोन्ही राज्यांबरोबर होणाऱ्या बैठकीत सहभागी होतील. ही बैठक व्हिडिओ कॉन्परन्सिंगच्या माध्यमातून सकाळी 11.30 वाजता होणार आहे. बैठकीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिवही उपस्थित राहतील. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पीएमओ आणि गृह मंत्रालयाला माहिती दिली आहे. 

मुख्यमंत्री सोनोवाल यांनी मिझोरामचे मुख्यमंत्री जोराम थांगा यांना दूरध्वनीवरुम सीमेवर झालेल्या हिंसाचारावर चर्चा केली. सीमा वाद सोडवण्यासाठी आणि आंतरराज्या सीमेवर शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. 

मिझोरामचा आसामवर आरोप

दुसरीकडे मिझोरामने आसाम सरकारवर आरोप केले आहेत. मिझोराम येथील हिंसाचार झालेले वेरंगते गावाजवळ आणि आसाम येथील लैलापूर येथे सीआरपीएफचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

हेही वाचा- NEET 2020: यूपीतील आकांक्षाला पैकीच्या पैकी गुण तरीही देशात दुसरी; जाणून घ्या कारण

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आसाम सरकारने म्हटले आहे. हिसांचाराचे प्रकार दरवर्षी होतात, असे स्थानिक आमदार परिमल शुक्ला वैद्य यांनी सांगितले. दोन्ही बाजूचे लोक अवैधरित्या वृक्षतोड करतात त्यामुळे हिंसाचार होतो, असेही ते म्हणाले. 

हेही वाचा- कमलनाथ यांचे माजी मंत्री इमरती देवींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, शिवराज चौहान यांचे मौनव्रत

शनिवारी सायंकाळी लाठ्या-काठ्या घेऊन आसाममधील काही लोक सीमेवरील गावाच्या बाहेरील भागात असलेल्या रिक्षा स्थानकाजवळ आले आणि त्यांनी एका जमावावर दगडफेक केली. त्यानंतर वेरंगते गावातील लोक मोठ्यासंख्येने एकत्र जमा झाले. संतापलेल्या जमावाने राष्ट्रीय महामार्गावरील लैलापूर गावातील सुमारे 20 झोपड्या आणि दुकाने पेटवून दिल्याचे कोलासिब जिल्ह्याचे पोलिस उपअधिक्षक एच लल्थलंगलियाना यांनी सांगितले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assam Mizoram Border Violent Clash Center Calls Meeting