NEET 2020: यूपीतील आकांक्षाला पैकीच्या पैकी गुण तरीही देशात दुसरी; जाणून घ्या कारण

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 19 October 2020

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET 2020 चा निकाल शुक्रवारी अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला.

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET 2020 चा निकाल शुक्रवारी अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला. यामध्ये ओडिशाच्या शोयेब आफताबने नीट 2020 च्या परीक्षेत 720 पैकी 720 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. उत्तर प्रदेशमधील कुशीनगरच्या आकांक्षा सिंहलाही नीटमध्ये 720 पैकी 720 गुण मिळवले आहेत, पण तिच्या कमी वयामुळे आकांक्षा नीट (NEET 2020) परिक्षेत देशात दुसरी आली आहे. 

टाय-ब्रेकिंग नियमानुसार गुण समान असताना वय, विषयवार गुण आणि चुकीची उत्तरे यांसारख्या घटकांचा विचार केला जातो. ओडिशाचा सोयेब आफताब आणि उत्तर प्रदेशच्या कुशीनगरच्या आकांक्षा सिंग या दोघांनीही नीट परीक्षेत 720 गुण मिळवले आहेत. पण आफताब वयाने मोठा असल्याने राष्ट्रीय रँकिंगमध्ये त्याला अव्वल घोषित केले आहे.

वाचा सविस्तर: न्यायालय ही मनमानीची जागा नाही : न्यायालय

सुरुवातीला नीट परीक्षेतील उमेदवाराचे रँकिंग जीवशास्त्र (Biology) आणि रसायनशास्त्रातील (Chemistry) गुणांच्या आधारावर ठरवले जाते. त्यानंतर परीक्षेत मिळालेल्या गुणांचा वापर करून उमेदवारांची निवड करता येत नसल्यास चुकीची उत्तरे विचारात घेऊन उमेदवारांची निवड केली जाते. तिथेही काही नाही झाले तर शेवटी त्यांच्या वयानुसार त्यांची निवड केली जाते. ज्या विद्यार्थ्याचे वय जास्त असेल त्याला पहिले प्राधान्य दिले जाते.

तसेच या परिक्षेतून 5 विद्यार्थ्यांना बाद केले आहे. परिक्षेदरम्यान हे पाच विद्यार्थी कॉपी करताना आढळले होते. त्यामुळे या पाच विद्यार्थ्यांचा निकाल रद्द करण्यात आला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील ठाणा बाजारिया, कानपूर नगर येथील दोन विद्यार्थ्यांचा समावेश होता. 

केंद्राविरुद्ध सोनिया गांधी झाल्या आक्रमक

NEET(UG) 2020 ची ठळक वैशिष्ट्ये:
नीट 2020 च्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 97 हजार 435 उमेदवारांनी नोंदणी केली होती. एकूण नोंदणीकृत उमेदवारांपैकी 13 लाख 66 हजार 945 उमेदवारांनी नीटची परिक्षा दिली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NEET 2020 exam result out on friday akansha sinh and shoyeb afatab