esakal | "विजयोत्सवांवर तात्काळ बंदी घाला"; निवडणूक आयोगाचं राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र

बोलून बातमी शोधा

WB Election result
"विजयोत्सवांवर तात्काळ बंदी घाला"; निवडणूक आयोगाचे राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशात आज निवडणूक निकालांचा दिवस आहे. देशात पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे आज निकाल जाहीर होत आहेत. या सर्व राज्यांमध्ये कोण सत्तेत येईल हे देखील आता जवळपास स्पष्ट होत आलंय. त्यामुळे जिंकत असलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी एकत्र येऊन विजयोत्सव साजरा करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, देशात सध्या कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं सर्व राज्यांसाठी एक पत्र लिहिलं असून "विजयोत्सवांवर तात्काळ बंदी घाला" असे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगानं सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना हे पत्र लिहिलं असून त्यात म्हटलंय की, "निवडणुकांच्या विजयोत्सवांवर तात्काळ बंदी घाला. तसेच अशा प्रकारे गर्दीला कारणीभूत ठरणाऱ्या SHO आणि इतर अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं तसेच त्यांच्याविरोधात गुन्हेगारी आणि दंडात्मक कारवाई सुरु करायला हवी"

हेही वाचा: Live: ममतांच्या विजयानंतर शरद पवारांचे ट्विट

देशात आज पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी येथील विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यातील कलांनुसार, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे, या ठिकाणी भाजपा पिछाडीवर आहे. त्याचबरोबर आसाममध्ये सत्ताधारी भाजप आणि केरळमध्ये सत्ताधारी डावे पुन्हा जिंकण्याच्या दृष्टीने पुढे आहेत. तर तामिळनाडूत एआयडीएमकेला धूळ चारुन डीएमके आघाडीवर आहे. तर पुदुच्चेरीत भाजप आघाडीवर आहे.

हेही वाचा: Live : केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीत कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपला खिजवण्यासाठी भाजप कार्यालयाबाहेर एकत्र येत विजयी जल्लोष करायला सुरुवात केली आहे. तसेच तामिळनाडूत देखील डीएमकेच्या समर्थकांनी विजयोत्सव सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर डीएमकेचे नेते इलांगोवन यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक आयोगाच्या आदेशाच पालन करत आपल्या घरातच विजय साजरा करण्याचा सल्ला दिला आहे, आपला पक्ष हा एक जबाबदार राजकीय पक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.