Election Result Live : आसाममध्ये भाजप, तर केरळमध्ये पुन्हा एलडीएफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Assembly Election 2021

Live : आसाममध्ये भाजप, तर केरळमध्ये पुन्हा एलडीएफ

केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. केरळमध्ये सध्या एलडीएफची सत्ता असून 2016 च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टीच्या लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटनं 91 जागा जिंकल्या होत्या. आसाममध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. 126 विधानसभेच्या जागा असलेल्या आसाममध्ये 2016 च्या निवडणुकीत सत्तांतर झालं होतं. 15 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला धक्का देत भाजपने 86 जागा जिंकल्या होत्या. केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीत विधानसभेच्या 30 जागा आहेत. 2016 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीएने इथं सत्ता मिळवली होती. युपीएनं 17 जागा जिंकल्या होत्या.

आसाममध्ये १४० जागांवर कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहेत यावर शिक्कमोर्तब होत आहे. ४९ जागांचे निकाल हाती आले असून भाजपने २६ तर काँग्रेसने ८ जागांवर विजय मिळवला आहे. १५ जागा इतर पक्षांना मिळाल्या आहेत तर उर्वरित जागांचे निकाल अजून प्रतीक्षेत आहेत.

केरळमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सीस्ट) ५१ जागांसह पहिल्या स्थानी आहे. ११८ जागांचे निकाल जाहीर झाले असून आणखी २२ निकाल प्रतीक्षेत आहेत.

पुदुच्चेरीत ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसला सर्वाधिक १० जागांवर, तर भाजप डीएमकेला प्रत्येकी ३ जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसच्या २, ४ अपक्ष उमेदवारांना विजय मिळाला आहे. आणखी ७ जागांवरील निकाल प्रतीक्षेत आहेत.

निवडणुकीच्या लाइव्ह अपडेट्स रात्री 9 वाजेपर्यंतच्या असून यापुढील अपडेट आणि इतर घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा.

'हा विजय मी केरळच्या जनतेला नम्रपणे समर्पित करतो. त्यांनी एलडीएफच्या बाजूने निकाल दिला आहे. पण ही वेळ आनंदोत्सव साजरा करण्याची नाही,' असे मुख्यमंत्री पिनराइ विजयन यांनी म्हटले आहे.

केरळच्या आरोग्यमंत्री विजयी

केरळचे आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी मत्तनूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली.

हिमंता बिस्वा सर्मा यांचा दणदणीत विजय

आसाममधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी जळुकबारी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि १ लाख १ हजार ९११ मतांनी दणदणीत विजय मिळवला.

 • केरळमधील ६ जागांचे निकाल हाती

केरळमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्किस्ट) ३, इंडियन नॅशनल लीग १, केरळ काँग्रेस (जॅकोब) १ आणि रिव्हॉल्युशनरी मार्क्सिस्ट पार्टी ऑफ इंडियाने १ जागेवर विजय मिळवला आहे.

 • पुदुच्चेरीतील ८ जागांचे निकाल जाहीर

ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसला सर्वाधिक ४ जागांवर विजय मिळाला आहे. भाजप ३ जागांसह दुसऱ्या स्थानी असून डीएमकेला एका जागेवर विजय मिळाला आहे.

 • एन.आर.काँग्रेचा दोन जागांवर विजय

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीतील चार जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यापैकी ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसला २ जागांवर तर भाजप आणि डीएमके पक्षाला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. कादिरगमम मधील एन.आर.काँग्रेसचे उमेदवार के.एस.पी.एस. रमेश यांनी काँग्रेसच्या पी. सेल्वनादन यांना १२ हजार २४६ मतांनी धूळ चारली. तर मंगलम विधानसभा मतदारसंघातील एन.आर.काँग्रेसचे उमेदवार डीजेकोमर सी. (DJEACOUMAR .C) यांनी डीएमकेच्या एस. कुमारावेल यांचा २ हजार ७५१ मतांनी पराभव केला.

 • भाजपला १ जागेवर विजय

कामराजनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार ए. जॉनकुमार यांनी काँग्रेसच्या शाहजहान यांचा ७ हजार २२९ मतांनी पराभव केला.

 • डीएमकेनं खातं उघडलं

ओपालम मतदारसंघातील डीएमकेचे उमेदवार अन्निबल केनेडी यांनी एआयएडीएमकेच्या ए.अंबलगम यांचा ४ हजार ७८० मतांनी पराभव करत डीएमकेचं खातं उघडलं.

हेही वाचा: "विजयोत्सवांवर तात्काळ बंदी घाला"; निवडणूक आयोगाचे राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश

 • आसाममध्ये भाजप आघाडीवर

आसाममध्ये चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. सत्ताधारी भाजप ८४ जागांसह आघाडीवर आहे. ४१ जागांसह काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भाजपच आसाममध्ये सरकार स्थापन करणार, असा दावा केला आहे.

 • केरळमध्ये एलडीएफला कौल

केरळमध्ये एलडीएफ सर्वाधिक ८५ जागांसह आघाडीवर आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन हे धर्मादाम मधून आघाडीवर आहेत. काँग्रेस ४९ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपला फक्त ४ जागांवर आघाडी मिळाली आहे. मेट्रोमॅन ई श्रीधरन हे पलक्कडमधून आघाडीवर आहेत.

 • पुदुच्चेरीत एनडीएला आघाडी

पुदुच्चेरीत एनडीए १२ जागांसह आघाडीवर आहे. तर काँग्रेसला ४ जागांवर आघाडी मिळाली आहे.

हेही वाचा: जयललितांनंतर राज्य सांभाळणारे पलानिस्वामी सत्ताच्युत; द्रमुक विजयी

 • केरळमध्ये एलडीएफच

केरळमध्ये एलडीएफ सर्वाधिक ८० जागांसह आघाडीवर आहे. तर काँग्रेस ५५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपला फक्त २ जागांवर आघाडी मिळाली आहे.

 • आसाममध्ये काँग्रेस पिछाडीवर

आसाममध्ये सुरवातीच्या टप्प्यात भाजपला चुरशीची लढत देत असलेला काँग्रेस पक्ष पिछाडीवर पडला आहे. ३९ जागांसह भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेसला २३ जागांवर आघाडी मिळाली आहे.

 • पुदुच्चेरीत भाजपला खातेही उघडता आलं नाही

पुदुच्चेरीत यंदा कमळ फुलणार का अशी चर्चा प्रचारादरम्यान चर्चिली जात होती. पण हाती आलेल्या कलांमध्ये भाजपला अजून खातेही उघडता आलेले नाही. एनआर काँग्रेस ९ जागांसह तर काँग्रेस ५ जागांसह आघाडीवर आहे.

 • आसाममध्ये भाजप काँग्रेसमध्ये फाईट

आसाममध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस दिसून आली आहे. भाजप २४, तर काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर आहे.

 • पुदुच्चेरीत एनआरसी आघाडीवर

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीत एनआरसी (ऑल इंडिया एनआर काँग्रेस) ४ जागांसह आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रसनेही खाते उघडले आहे.

 • केरळमध्ये एलडीएफ आघाडीवर

केरळमध्ये एलडीएफ ५२ जागांसह आघाडीवर आहे. काँग्रस ४१, तर भाजपला तीन जागांवर आघाडी मिळाली आहे.

 • आसाममध्ये भाजप आघाडीवर

१२६ जागांसाठीची मतदान प्रक्रिया सुरू झाली असून सुरवातीच्या टप्प्यात भाजपने मुसंडी मारली आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भाजप १०, काँग्रेस ५, एजेपी (आसाम जैत्य परिषद) २ जागांवर आघाडीवर होते.

 • केरळमध्ये काँग्रेसची मुसंडी

दुसरीकडे केरळमध्ये एलडीएफला मागे टाकत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. काँग्रेस २६, एलडीएफ ३०, तर भाजप ३ जागांवर आघाडीवर होते.

केरळ - कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी पुथुपल्ली चर्चमध्ये प्रार्थना केली. ते पुथुपल्ली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत.

दुसरीकडे दिब्रुगडमधील शासकीय मुलांचे उच्च माध्यमिक विद्यालय आणि उपायुक्त कार्यालय या दोन ठिकाणी मतमोजणीला सुरवात झाली आहे.

केरळमध्ये एलडीएफ आणि युडीएफमध्ये काँटे की टक्कर?

केरळमध्ये सध्या एलडीएफची सत्ता असून 2016 च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टीच्या लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटनं 91 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युडीएफ दुसऱ्या स्थानी होते. CPIM ने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तर त्यानंतर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. काग्रेसनं 22 जागा जिंकल्या होत्या. कम्युनिस्ट पार्टीने 19 तर इंडियन युनियन मुस्लिम लीगने 18 जागांवर विजय मिळवला होता.

आसाममध्ये भाजप सत्ता राखणार का?

आसाममध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. 126 विधानसभेच्या जागा असलेल्या आसाममध्ये 2016 च्या निवडणुकीत सत्तांतर झालं होतं. 15 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला धक्का देत भाजपने 86 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 26 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तर आसाम गण परिषदेनं 14 आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटने 12 जागा जिंकल्या होत्या.

पुदुच्चेरीत कमळ फुलणार?

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीत विधानसभेच्या 30 जागा आहेत. 2016 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीएने इथं सत्ता मिळवली होती. युपीएनं 17 जागा जिंकल्या होत्या. त्यात काँग्रेसला 15 जागा मिळाल्या होत्या. एनआर काँग्रेसनं 8 तर डीएमकेनं 5 जागांवर विजय मिळवला होता.

Web Title: Kerala Assam Pondicherry Assembly Election 2021 Results Live Updates Dmk Admk Bjp Congress Cpim Ldf

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top