अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्स रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. वाजपेयी यांना अँटिबायोटिक्‍स दिले जात असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. जोपर्यंत संसंर्गावर नियंत्रण होत नाही, तोपर्यंत वाजपेयी रुग्णालयातच राहतील, असे एम्सच्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे. 

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्स रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. वाजपेयी यांना अँटिबायोटिक्‍स दिले जात असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. जोपर्यंत संसंर्गावर नियंत्रण होत नाही, तोपर्यंत वाजपेयी रुग्णालयातच राहतील, असे एम्सच्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे. 

93 वर्षीय वाजपेयी यांना सोमवारी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या तब्येतीची आणि उपचाराची विचारपूस केली. आज सकाळी एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णालयाबाहेर आल्यानंतर वायको यांनी अटलजी यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगून काळजीचे कोणतेही कारण नाही, असे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. 

एम्स रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात वाजपेयी यांच्यावर उपचार सुरू आहेत. या मजल्यावर उपचार घेणाऱ्या अन्य रुग्णांच्या नातेवाइकांना ओळखपत्र दाखवल्यावरच आत सोडण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री अश्‍विनीकुमार चौबे, माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र, केंद्रीय राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी आज सकाळी वाजपेयी यांची भेट घेतली.

Web Title: Atal Bihari Vajpayee's health is stable now