अटल युगान्त

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

स्वतंत्र भारतात पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर कॉंग्रेस नेते असलेले वाजपेयी हे तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले. तत्पूर्वी 1977मध्ये जनता पक्षाच्या सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली.

आज अंत्यसंस्कार; सात दिवसांचा दुखवटा 

नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे सर्वप्रिय नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. "मौत की उमर क्‍या है? दो पल भी नहीं, जिंदगी का सिलसिला आज कल की नही, मैं जी भर जिया, मैं मन से मरुं, लौटकर आऊंगा, कूच से क्‍यों डरु?' असे थेट मृत्यूलाच आव्हान देणाऱ्या अटलजींच्या देहावसानामुळे भारतीय लोकशाहीतील एक ओजस्वी पर्व संपले. गेले नऊ आठवडे राजधानी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अधिकच ढासळली, आणि आज सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी त्यांची प्राणज्योत निमाली. 

गावोगाव जनसंघाची ज्योत नेणारा परिश्रमी कार्यकर्ता, संवेदनशील कवी, अमोघ वक्‍ता, सजग पत्रकार, धोरणी राजकारणी अशा अनेक भूमिका अटलजींनी पार पाडल्या. कारकिर्दीचा बहुतांश काळ विरोधी पक्षात राहूनही राष्ट्रीय प्रश्‍नावर प्रसंगी सत्ताधाऱ्यांच्या खांद्यास खांदा लावून उभा राहणारा उदारमतवादी राजकारणी, अशी त्यांची उंच प्रतिमा होती. विसंवादाच्या वातावरणात त्यांच्यासारख्या संवादी नेतृत्वाची उणीव जाणवत राहील, अशी भावना जनमानसात व्यक्‍त होत आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय लोकशाहीचा एक आधारस्तंभ निखळला आहे. 

राजघाटावरील स्मृती स्थळ येथे उद्या (ता. 17) सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. वाजपेयी यांच्या निधनानिमित्त केंद्राने सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सायंकाळी झालेल्या तातडीच्या बैठकीत वाजपेयी यांच्या निधनानिमित्त शोक प्रस्ताव मंजूर केला. दिल्ली सरकारनेही उद्या शासकीय सुटी जाहीर केली आहे. 
वाजपेयी यांचे पार्थिव आज सायंकाळी सातनंतर त्यांच्या शासकीय निवासस्थानी, म्हणजे 6-अ कृष्ण मेनन मार्ग येथे आणण्यात आले. तेथे ते रात्रभर चाहत्यांना दर्शन घेण्यासाठी ठेवले जाईल. उद्या (ता. 17) भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात त्यांचे पार्थिव ठेवले जाईल व दुपारी दोनपासून त्यांचा अखेरचा प्रवास सुरू होईल. 

गेले किमान दशकभर सक्रिय राजकारणापासून पूर्णतः दूर असूनही वाजपेयींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी काल रात्रीपासूनच "एम्स' परिसरात जी प्रचंड गर्दी झाली होती त्यावरूनच वाजपेयी यांच्या करिष्म्याची कल्पना येते. "एम्स'ने आज सायंकाळी पाच वाजून 25 मिनिटांनी जारी केलेल्या निवेदनात वाजपेयी यांचे निधन झाल्याची शोकवार्ता दिली. त्यानंतर काही क्षणांतच भाजप मुख्यालयावरील पक्षाचा झेंडा अर्ध्यावर उतरविण्यात आला. 

आज सकाळपासूनच सर्वपक्षीय नेत्यांची "एम्स'कडे रीघ लागली होती. दुपारपर्यंत भाजप मुख्यालय व इतरत्र सुरू झालेल्या हालचाली पाहता शंकेची पाल चुकचुकली होती. सायंकाळी वाजपेयी यांनी नश्‍वर देहाचा त्याग करून अमर तत्त्वाकडे प्रस्थान ठेवल्याचे जाहीर होताच चाहत्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. वाजपेयी यांनी ज्यांचे नेतृत्व घडविले, ते जे. पी. नड्डा, थावरचंद गेहलोत, शहानवाज हुसेन, मुख्तार अब्बास नक्वी, श्‍याम जाजू आदी असंख्य नेत्या-कार्यकर्त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले. 

2006 -07 नंतर स्मृतीभ्रंशाच्या विकाराने (डिमेन्शिया) वाजपेयी यांची प्रकृती झपाट्याने घसरत गेली. त्यांचे बोलणे व सार्वजनिक वावर हळूहळू कमी होत गेला व 2009 नंतर तो पूर्णतः बंदच झाला. 2015 मध्ये मोदी सरकारने तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना भारतरत्न सन्मान दिला त्या वेळी प्रसिद्ध झाले ते त्यांचे अखेरचे छायाचित्र ठरले. 

तीन वेळा पंतप्रधान 

स्वतंत्र भारतात पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर कॉंग्रेस नेते असलेले वाजपेयी हे तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले. तत्पूर्वी 1977मध्ये जनता पक्षाच्या सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. या काळात संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात त्यांनी हिंदीतून भाषण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. त्यानंतर 1996 ते 20004 या काळात त्यांनी 13 दिवस, 13 महिने व पाच वर्षे देशाचा कारभार समर्थपणे हाताळला.

भाजपच्या किमान दोन डझन मित्रपक्षांना सांभाळून घेत त्यांनी पाच वर्षे यशस्वीरीत्या सरकार चालविले. विरोधकांना प्रत्युत्तर देताना, टीका करतानाही भाषेची शालिनता व राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपण्याची वृत्ती त्यांनी कायम जपली. राजकारणाच्या धबडग्यातही अंतरातील काव्यवृत्ती व विनोदाचा बाज त्यांनी कधी हरवू दिला नाही. 2004 च्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यावर 2005 मध्ये वाजपेयी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती स्वीकारली व "लालकृष्ण अडवानींच्या नेतृत्वाखाली विजयपथाकडे प्रयाण करूयात' अशा आशा भाजप कार्यकर्त्यांत जागविल्या. 

Web Title: Atalbihari Vajpayee Atal yug ends