३० वर्षांपूर्वीही ममतांवर झाला होता जीवघेणा हल्ला, जखमा अन् हल्ल्यांनी ममतांच्या राजकीय कारकिर्दीला दिला आकार

attacked on mamata banerjee before 30 years in west bengal politics news
attacked on mamata banerjee before 30 years in west bengal politics news

नागपूर : पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चपासून ८ टप्प्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि तृणमुल काँग्रेस दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली असून जोरदार प्रचार केला जात आहे. अशातच दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत. याच निवडणुकीच्या राजकारणात काही भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची बातमी आली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर त्यांनी उपचार देखील घेतले. हा हल्ला भाजपने केला असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मात्र, त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. आता हा हल्ला खरंच झाला होता, की निवडणुकीच्या अनुषंगाने झालेला राजकीय स्टंट होता? हा विषय वेगळा. मात्र, ममता बॅनर्जी यांच्यावर पहिल्यांदाच हल्ला झालेला नाही. याच हल्ले आणि जखमांनी त्यांची राजकीय कारकिर्द घडविली आहे.

ममता बॅनर्जी यांनी जनमानसामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या चार दशकांच्या कारकिर्दीमध्ये अनेक हल्ले आणि जखमांचा सामना केला आहे. त्यामुळेच एक चांगल्या आणि कणखर राजकारणी म्हणून त्या उदयास आल्या. मात्र, अशा घटनांनंतर त्या पुन्हा उठून उभ्या राहिल्या आणि विरोधकांवर अधिक आक्रमक झाल्याचे प्रत्येकवेळी पाहायला मिळाले. १९९० च्या काळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या युवा नेत्याने ममता यांच्या डोक्यावर काठीने वार केला होता. त्यानंतर त्यांनी जवळपास महिनाभर रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यानंतरच त्या  तृणमूल काँग्रेसचा चेहरा असलेल्या ममता यांनी या एक निर्भिड व्यक्तीमत्व, पोलादी बांधा आणि राजकीय शैली या जोरावर पक्ष बांधला होता.

ममतांवर १९९० मध्ये का झाला होता हल्ला?
ममता बॅनर्जी १९९० च्या दशकात काँग्रेसच्या युवा नेत्या होत्या. त्यावेळी खाद्य तेलामधील भेसळीमुळे काँग्रेसने प्रदर्शन केले. यावेळी ममता बॅनर्जी यांनी अनेकठिकाणी मोर्चे काढले होते. त्याचप्रमाणे बंगालमधील हाजरा येथेही मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी जवळपास ११ वाजण्याच्या सुमारास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता आणि तथाकथित गुंड लालू आजम याने काठीने ममतांच्या डोक्यावर वार केला होता. यावेळी ममता जागेवरच बेशुद्ध पडल्या होत्या. त्या थोडक्यात बचावल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आरोपी आजम हा सुरुवातीला काँग्रेसचाच कार्यकर्ता होता. मात्र, त्याने १९८० मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्या जिल्ह्यावर त्याची मजबूत पकड होती. मात्र, ममतांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सीपीआयएमने त्याला बाहेरचा रस्ता दाखविला. 

आजमवर जवळपास २९ वर्ष खटला चालला. त्यानंतर न्यायालयाने २०२९ मध्ये  पुरेसे पुरावे न मिळाल्याचे सांगत आजमची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर ममता यांनी त्यांची नाराजी बोलून दाखविली होती. हा एकच हल्ला नव्हता. पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये असे अनेक भयंकर हल्ले झाले आहेत.  

पोलिस अन् युवा काँग्रेस वाद -   
१९९३ मध्ये काँग्रेस युवा मोर्चाच्या सदस्य असताना ममता यांच्या नेतृत्वात मतदान ओळखपत्राच्या मागणीसाठी सचिवालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी देखील पोलिसांकडून मारहाण झाली होती. त्यावेळी युवा काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिस एकमेकांत भिडले होते. त्यावेळी ममता यांना देखील मारहाण झाली होती. त्यानंतर त्यांच्या काही आठवडे रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

...अन् ममतांनी ३४ वर्ष सत्ता भोगलेल्या माकपचा केला सुफडासाफ -
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या  सध्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमधील सर्वात मोठ्या राजकीय लढाईचा सामना करत आहेत. यावेळी देखील नंदीग्रामध्ये त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार केली. त्यानंतर छातीत दुखत असल्याचे सांगत त्या रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांच्यावर चार ते पाच जणाच्या टोळक्यानी हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. हे तेच नंदीग्राम आहे जिथे ममता यांच्या पक्षाने २००७ मध्ये ऐतिहासिक भूमि अधिग्रहण चळवळ चालविली होती. तसेच पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्यांचा थरारही ममता यांनी बघितला होता. मात्र, न घाबरता त्या परिस्थितीला समोर गेल्या होत्या. त्यामुळे हे नंदीग्राम त्यांच्या कारकिर्दीमध्ये महत्वाची भूमिका बजावते. याच चळवळीच्या जोरावर ममता यांनी २०११ मध्ये सर्वाधिक वेळ सत्तेत राहिलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव केला होता. तब्बल ३४ वर्ष सत्ता गाजविल्यानंतर केवळ ममतांमुळे माकपचा पश्चिम बंगालमध्ये सुफडासाफ झाला होता. दरम्यान, सर्वात मोठा स्पर्धक म्हणून उदयास आलेल्या भाजपने ममता यांना तिसऱ्यांदा सत्तेत येऊ न देण्याचा विडाच उचलला आहे. त्यामुळे नंदीग्रामध्ये भाजपने ममता यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपही ममता यांनी केला होता. 

हे सर्व हल्ले आणि शारीरिक जखमा यावरून ६६ वर्षीय ममता यांची राजकीय कारकिर्द कशी घडत गेली, याचा प्रत्यय आपल्याला येतो. 

१९८४ मध्ये पहिल्यांदा चर्चेत आल्या होत्या ममता -
ममता बॅनर्जी या युवा काँग्रेसच्या नेत्या असताना  त्यांनी माजी लोकसभा स्पीकर आणि माकप नेते सोमनाथ चॅटर्जी यांच्याविरोधात १९८४ची लोकसभा निवडणूक लढविली होती. त्याच काळात इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. त्यामुळे सहानभुतीच्या लाटेत ममता यांनी चॅटर्जी यांचा पराभव केला होता. त्यावेळी पहिल्यांदा त्या चर्चेत आल्या होत्या. मात्र, त्यानंतर १९८९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ममता यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 

तृणमुल काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतरही झाला होता हल्ला -
ममता यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत तृणमुल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्याच्या २ वर्षानंतर २००० ते २००१ च्या काळात ममता यांच्या गाडीवर केशपूर आणि चमाकैतला या दोन्ही ठिकाणी लगातर हल्ले झाले होते. टीएमसी आणि सीपीआयएम यांच्यामधील रक्तरंजीत थरारामध्ये टीएमसीचे काही कार्यकर्ते देखील मारले गेले होते. ममता या पश्चिम मिडनापूर या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या कारमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यामध्ये टीएमसीचे ११ कार्यकर्ते मारले गेले होते. 

दरम्यान, २००६ ते २००७ च्या काळात सीपीआयएमच्या कथित गुंडांकडून ममता यांच्यावर बॉम्बहल्ले झाल्याचा आरोप करण्यात आला. तसेच नंदीग्रामध्ये प्रवेश निषिद्ध करत त्यांच्या कारवर गोळीबारही केल्याचे म्हटले होते. याचठिकाणी भूमी अधिग्रहण चळवळीमुळे वाद झाला होता. २००६ मध्ये सिंगूर येथील गटविकास अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करताना पोलिसांनी ममता यांना पकडून आंदोलन थांबविण्यास भाग पाडले होते. 

रेल्वेमंत्री असताना कारला ट्रकची धडक -
ममता या २०१० मध्ये रेल्वेमंत्री असताना त्यांच्या ताफ्यामधील कारला ट्रकने धडक दिली होती. त्यावेळी ममता या लालगड येथील बुरुजाच्या मोर्चातून परत येत होत्या. हा देखील त्यांच्यावर जाणूनबुजून केलेला हल्ला असल्याचा आरोप ममता यांनी त्यावेळी केला होता. त्यावेळी विरोधकांनी या हल्ल्याची मात्र खिल्ली उडविली होती. बॅनर्जी या सहानुभूती मिळविण्यासाठी स्वतःच हल्ल्याचं राजकारण करत असल्याचा आरोप माकपच्या नेत्यांनी केला होता. आता बुधवारी झालेल्या हल्ल्यावेळी देखील ममता यांच्यावर चौफेर टीका झाली. सहानुभूतीपूर्वक मते मिळविण्यासाठी ममता यांनी हल्ल्याचा बनाव केल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com