
औरंगाबाद विमानतळ व्हावे ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ'
नवी दिल्ली : मराठवाडयातील पर्यटन व औद्योगिकदृष्टया अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या औरंगाबाद विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे करण्यास तसेच हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे या मागणीबाबत केंद्रीय मुलकी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असे राज्याचे उद्योगमंत्त्री व औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजुरीनंतर हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
औरंगाबाद प्रमाणेच देशातील १३ राज्यांतील विमानतळांच्या नावांत बदल करण्याचे प्रस्ताव आपल्या मंत्रीलयाकडे आले आहेत. देसाई यांनी आज मुलकी विमान वाहतूक मंत्त्रालयाच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात शिंदे यांची भेट घेऊन औरंगाबाद विमानतळाबाबतचे निवेदन त्यांना दिले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे करण्यास यापूर्वीच मंजुरी देण्यात आली असून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे. आता याला विमान वाहतूक मंत्रालयाने मान्यता द्यावी, अशी मागणी देसाई यांनी केली. औरंगाबाद विमानतळावर ‘छत्रपती संभाजी महाराजां’चा पुर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
औरंगाबादला पर्यटक व प्रवाशांची वाढती संख्या पाहता या विमानतळावरील विमानांच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी देसाई यांनी यावेळी केली. मुंबई व औरंगाबाद दरम्यान संध्याकाळप्रमाणेच रोज सकाळीही नियमित विमान सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
...आधी जमीन द्या !
देसाई यांनी सांगितले की, मराठवाडयात अजिंठा -वेरुळ लेण्यांसह विविध पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांना जगभरातील पर्यटक भेटी देतात. पर्यटक व प्रवशांचा वाढता ओघ पाहता औरंगाबाद विमानतळाची सद्याची धावपट्टी लहान पडत असून या धावपट्टीच्या विस्ताराची गरज आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक जमीन अधिग्रहण करण्यात येईल असे त्यांनी सांगताच, राज्य शासनाने जमीन अधिग्रहण करून दिल्यास विमानतळ धावपट्टीचा विषय तातडीने मार्गी लावता येईल,असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
Web Title: Aurangabad Airport Should Be Chhatrapati Sambhaji Maharaj Airport Jyotiraditya Scindia Subhash Desai Delhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..