अयोध्या: मंदिरातील गर्दीत गुदमरून महिलेचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

अयोध्येतील कणक भवन मंदिरात प्रचंड गर्दीमुळे एका महिलेचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आणखी एक महिला जखमी झाली आहे.

अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येतील कणक भवन मंदिरात प्रचंड गर्दीमुळे एका महिलेचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आणखी एक महिला जखमी झाली आहे.

राम नवमीनिमित्त आज (बुधवार) सकाळी शरयू नदीतील पवित्र स्नानानंतर भाविक मंदिराच्या दिशेने जात होते. त्यावेळी एका महिलेचा मृत्यू झाला. एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, याबाबत प्रशासन तपास करत आहे.

फैजाबादचे विशेष पोलिस अधिक्षक अनंत देव यांनी याबाबत माहिती दिली. वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, "उच्च रक्तदाबाचा त्रास अलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तिला अस्वस्थता जाणवू लागली आणि तिच्या नाकातून रक्त येऊ लागले. त्यामुळे तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे तिचा मृत्यू झाला. आणखी एक पाय घसरल्याने जखमी झाली आहे. तिलाही रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती धोक्‍याबाहेर आहे.' अयोध्येतील कणक भवन मंदिरात सुरक्षेचा पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिरात चेंगराचेंगरीसारख्या प्रकाराची शक्‍यता नव्हती, असे देव यांनी सांगितले.

Web Title: Ayodhya: 1 killed, 2 injured in stampede during Ram Navami celebrations