जाणून घ्या किती दिवसांत लागू शकतो अयोध्या प्रकरणाचा निकाल!

पीटीआय
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

दिवसभरात

  • २३ दिवसांत येणार अयोध्या प्रकरणाचा निकाल
  • मशीद बाबराने बांधल्याचे पुरावे मुस्लिम पक्ष देऊ न शकल्याचा हिंदू पक्षकारांचा दावा
  • उत्तर प्रदेशात सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्या ३० नोव्हेंबरपर्यंत रद्द  
  • अयोध्येत प्रशासनाने लागू केले कलम १४४
  • मध्यस्थांचा अहवाल न्यायालयासमोर सादर
  • तडजोडीच्या माध्यमातून तोडगा काढण्यात अपयश

नवी दिल्ली - अयोध्येतील राम जन्मभूमी- बाबरी मशीद खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आज पूर्ण झाली. सर्व पक्षकारांचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठलेल्या या ऐतिहासिक खटल्याचा निकाल १७ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्याआधी राम जन्मभूमी- बाबरी मशीद खटल्याचा निकाल जाहीर केला जाईल, असे घटनापीठाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर हिंदू आणि मुस्लिम पक्षाने चाळीस दिवस आपली बाजू मांडली. पाच वाजेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्यात येईल, असे गोगोई यांनी सकाळी सांगितले होते. मात्र, तासभर आधीच सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर सर्व पक्षकारांनी दिलाशांबाबतच्या पर्यायांसाठी (मोल्डिंग ऑफ रिलीफ) पुढील तीन दिवसांत आपले म्हणणे लेखी स्वरूपात न्यायालयाला सादर करण्याचे आदेश घटनापीठाने दिले. 

घटनापीठात सरन्यायाधीश गोगोई यांच्यासह न्या. एस. ए. बोबडे, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. ए. नझीर यांचा समावेश आहे. मध्यस्थांच्या माध्यमातून तोडगा काढण्यात अपयश आल्यानंतर ६ ऑगस्टपासून या खटल्याची दररोज सुनावणी घेण्यात आली. 

याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१०मध्ये दिलेल्या निकालाच्या विरोधात १४ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. अयोध्येतील २.७७ एकरची वादग्रस्त जागा सुन्नी वक्‍फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला अशा तिन्ही पक्षकारांना समान प्रमाणात देण्यात यावी असे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते.

नकाशा फाडला
हिंदू महासभेची बाजू मांडणारे वकील विकास सिंह यांनी भगवान रामाचे जन्मस्थळ दर्शविणारा नकाशा न्यायालयात सादर केला. त्याला मुस्लिम पक्षाकारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर वकील विकास सिंह यांनी सादर केलेल्या नकाशाचे काय करायचे, असा प्रश्न धवन यांनी घटनापीठाला विचारला. संबंधित नकाशाचे तुकडे करावेत, असे घटनापीठाने सांगितले. त्यानुसार धवन यांनी या नकाशाचे तुकडे केले. युक्तिवादावेळी विकास सिंह यांनी या वेळी माजी आयपीएस अधिकारी किशोर कुणाल यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा संदर्भ देण्याचा प्रयत्न केला. त्यावरही धवन यांनी आक्षेप नोंदविला.

धवन यांच्या कृत्यातून त्यांची मानसिकताही बाबरासारखीच असल्याचे दिसते.
- उमा भारती, नेत्या भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayodhya Issue Result Supreme Court