ayodhya verdict who ram janmabhoomi protest information in marathi
ayodhya verdict who ram janmabhoomi protest information in marathi

'या' 17 जणांनी घडविले रामजन्मभूमी आंदोलन 

अयोध्येतील रामजन्मभूमी आंदोलन सातत्यपूर्णरीत्या राबवणे, त्याचे नियोजन, कार्यवाही करणे, त्यासाठी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बळ उभे करणे, आंदोलनाचे विविध टप्पे यशस्वी होण्यासाठी अविरतपणे त्यासाठी पडद्यामागच्या हालचाली बिनचूकरीत्या राबवणे, यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत होती. त्यांच्याविषयी... 

आंदोलनाचे नायक 
अशोक सिंघल - 
रामजन्मभूमीमुक्तीसाठी "2-2-11' कालावधीत झालेल्या पूर्ण आंदोलनाचे नायक म्हणून सिंघल यांचेच नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. मेटॅलर्जिकल इंजिनियर असलेले सिंघल पदवी मिळाल्यानंतर संघाचे प्रचारक झाले. संघ व्यवस्थेनुसार 1980 मध्ये त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी दिली. ते "विहिंप'मध्ये आल्यानंतरच रामजन्मभूमीमुक्ती आंदोलनात "विहिंप'ने अधिक लक्ष घालणे सुरू केले. सिंघल "विहिंप'चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते. आंदोलनाला व्यापक रूप देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. 30 ऑक्‍टोबर 1990 रोजी मुलायमसिंह यादव यांच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला भेदत त्यांनी गनिमी काव्याने अयोध्येत प्रवेश केला आणि कारसेवकांचे नेतृत्वसुद्धा केले. ते लाठीहल्ल्यात जखमीही झाले. 6 डिसेंबर 1992 रोजीही ते अयोध्येत होते. 

आंदोलनाचा तरुण चेहरा 
विनय कटियार - 
विश्व हिंदू परिषदेच्या युवा शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनय कटियार हे होते. या आंदोलनाचा तरुण चेहरा म्हणून त्यांचा उल्लेख होतो. कटियार यांनी देशभरातील युवकांमध्ये या प्रश्नावर जनजागरण केले. दोन्हीही कारसेवेच्या वेळी देशभरातून हजारो युवक कारसेवक अयोध्येत पोचले. त्या नियोजनाचे शिल्पकार कटियार होते. 


आंदोलकांत आदरणीय 
महंत रामचंद्र परमहंस -
जन्मभूमी मुक्ती आंदोलनातील वयोवृद्ध चेहरा म्हणजे महंत रामचंद्र परमहंस. वयाच्या पंधराव्या वर्षी संन्यास घेतलेले परमहंस अयोध्येच्या दिगंबर आखाड्याचे प्रमुख होते. कारसेवेच्या वेळी ते वयाच्या सत्तरीत होते. 1950 मध्ये रामलल्लाच्या पूजेची परवानगी मिळवण्यासाठी त्यांनीच सर्वप्रथम न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि परवानगीही मिळवली. त्यामुळे या आंदोलनात परमहंसांच्या शब्दाला अतिशय महत्त्व होते. 

धर्माचार्यांचे संघटनकर्ते 
रामविलास वेदांती, महंत अवैद्यनाथ, महंत नृत्यगोपालदास -
या साऱ्या आंदोलनामागे धर्माचार्यांचे पाठबळ उभे करण्याची खरी जबाबदारी पार पाडली ती रामविलास वेदांती, महंत अवैद्यनाथ आणि महंत नृत्यगोपालदास यांनी. यातील महंत अवैद्यनाथ हे गोरखपूरच्या गोरखनाथ पीठाचे प्रमुख होते, तर महंत नृत्यगोपालदास अयोध्येच्या मणिरामदासजी छावणीचे महंत आहेत. रामविलास वेदांती हे धर्माचाऱ्यांच्या वर्तुळातील प्रमुख आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व मानले जातात.  

केले कार्यकर्त्यांना सक्रिय 
आचार्य गिरिराज किशोर, विष्णूहरी दालमिया - 
विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख नेते असलेले आचार्य गिरिराज किशोर, विष्णूहरी दालमिया हे दोघेही या आंदोलनात अशोक सिंघल यांचे प्रमुख सहायक होते. आचार्य गिरिराज किशोर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रचारक, तर विष्णूहरीजी हे प्रसिद्ध दालमिया उद्योग समूहाचे प्रमुख होते. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची पूर्ण यंत्रणा कार्यरत ठेवण्याची आणि त्यांना योग्य त्या सूचना वेळेनुसार देण्याचे नियोजन या दोन्ही नेत्यांनी बजावले. 

शरद पवार, सोनिया गांधींची घेणार भेट; नवी समीकरणे शक्य?

चेतविले आंदोलन 
साध्वी ऋतंभरा, साध्वी उमा भारती - 
या आंदोलनाला एका आगीचे रूप देण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते साध्वी ऋतंभरा आणि साध्वी उमा भारती यांनी. या दोन्ही धार्मिक नेत्यांच्या आक्रमक भाषणांनी आंदोलन काळात जनमानस ढवळून निघाले होते. खणखणीत आवाज, अस्खलित हिंदी आणि ओघवती भाषा या साऱ्यांना आक्रमकतेची जोड असल्याने या दोघींचीही भाषणे या काळात गर्दी खेचणारी होती.

आंदोलनाचे राजकीय नायक 
लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी -
भारतीय जनता पक्षाचे हे दोन्हीही प्रमुख नेते या आंदोलनाची राजकीय बाजू मजबुतीने सांभाळत होते. आंदोलनातील "2-2-11' या प्रमुख कालखंडाचा प्रारंभच मुळी अडवानींनी राममंदिराच्या पाठिंब्यासाठी सारनाथवरून काढलेल्या रथयात्रेने झाला. ही रथयात्रा लालूप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये अडवली आणि नंतरच्या घटनाक्रमाने भारतीय राजकारणाची दिशा बदलली. त्यामुळे रामजन्मभूमीमुक्ती आंदोलनाचे राजकीय नायक म्हणून अडवानी यांनाच नमूद करावे लागेल. मुरलीमनोहर जोशी हेसुद्धा या काळात अडवानींचे प्रमुख सहायक होते.  

नियोजनबद्ध यंत्रणेचे कर्ते 
मोरोपंत पिंगळे - 
मोरोपंत पिंगळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक. तसे आंदोलनात कोठेही न दिसणारे, पण सर्वत्र असणारे व्यक्तिमत्त्व मोरोपंतांचे होते, असे म्हणतात. पहिल्या कारसेवेच्या वेळी मुलायमसिंह यादव प्रशासनाच्या दडपशाहीचा सर्वांत मोठा अडथळा होता. अशा स्थितीत आंदोलन यशस्वी करणे, हे सर्वाधिक जिकिरीचे काम. देशभरातील कारसेवकांची कोणती तुकडी कोणत्या गावात थांबणार, त्यांच्या जेवण्याची आणि लपण्याची, प्रसंगी औषधोपचाराची सोय तेथेच उपलब्ध करून देणे, हे सर्व करून अयोध्येत सारे अडथळे ओलांडून कारसेवकांना पोचवणे, हे सारे सूक्ष्म नियोजन आणि व्यापक सक्षम यंत्रणेशिवाय शक्‍यच नव्हते. 

रथयात्रेचे कट्टर विरोधक 
मुलायमसिंह यादव -
अडवानी यांच्या रथयात्रेला उत्तर प्रदेशात प्रवेश करू देणार नाही, अशी घोषणा करीत तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी देशाचे लक्ष वेधून घेतले. कारसेवेलाही कडाडून विरोध केला. यामुळे मुस्लिमांचे तारणहार अशी त्यांची प्रतिमा झाली. त्याचा त्यांना मोठा राजकीय लाभ झाला. रथयात्रेच्या काळात अयोध्येत हजारो कारसेवक जमले होते. त्यांना रोखण्यासाठी यादव यांनी 30 ऑक्‍टोबर 1990 रोजी पोलिसांना गोळीबार करण्याचे आदेश दिला. अनेक कारसेवकांचा मृत्यू झाला.  

आंदोलनाची धुरा शिरावर 
कल्याणसिंह - 
उत्तर प्रदेशात राममंदिर आंदोलनाची सारी धुरा भाजपचे नेते कल्याणसिंह यांनी शिरावर घेतली. विनय कटियार यांच्या साथीने त्यांनी राज्यात रान पेटवले, तसेच कारसेवेचे नेतृत्व केले.  

रथयात्रा रोखून झाले हिरो 
लालूप्रसाद यादव - 
सोमनाथहून अयोध्येकडे निघालेली अडवानींची रथयात्रा समस्तीपूर येथे अडवून बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवानींना अटक केली. यामुळे भाजपने केंद्रातील व्ही. पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकार कोसळले. मात्र या घडमोडींत लालूप्रसाद हिरो ठरले. 

उत्तम राजकीय व्यूहरचनाकार 
प्रमोद महाजन - 1990 मध्ये राममंदिराबाबत जनजागृतीसाठी देशभर पदयात्रा काढण्याचे भाजपचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवानी यांनी ठरवले. भाजपचे तरुण नेते प्रमोद महाजन यांना ही माहिती समजली. पदयात्रा फारच संथ गतीने जाईल, त्यापेक्षा जीपमधून यात्रा काढली तर? असे महाजनांनी अडवानींना सुचविले. त्यांनीच पुढाकार घेऊन मिनीबसचे सुशोभीत रथात रूपांतर केले आणि पुढे सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेने इतिहास घडवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com