esakal | काँग्रेसने मागावी जनतेची माफी; बाबरी निकालानंतर योगी आदित्यनाथांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath

या निकालाचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आनंदाने स्वागत केलं आहे.

काँग्रेसने मागावी जनतेची माफी; बाबरी निकालानंतर योगी आदित्यनाथांची मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अयोध्येतील बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल आज लागला. 1992 मध्ये बाबरी विध्वंस प्रकरणी लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालय आज निकाल दिला. बाबरी मशीद पाडण्याचा कट हा पूर्वनियोजित नव्हता, असा निर्वाळा देत या प्रकरणातील सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 20 जण मुख्य आरोपी होते. या सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 

हेही वाचा - बाबरी प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल

या निकालाचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आनंदाने स्वागत केलं आहे. ट्विट करुन त्यांनी म्हटलंय की, सत्यमेव जयते! सीबीआयच्या विशेष न्यायलयाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. तत्कालीन काँग्रेसद्वारे राजकारणासाठी पूज्य संतांवर, नेत्यांवर, विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर, समाजसेवकांवर खोटे खटले दाखल केले होते. या खटल्यांत अडकवून त्यांना बदनाम केलं गेलं. या सगळ्या षड्यंत्रासाठी काँग्रेसने जनतेची माफी मागायला हवी. अशी मागणी योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. 

1992 साली देशव्यापी रथयात्रा काढण्यात आली होती, जिचं नेतृत्व लालकृष्ण अडवाणी यांनी केलं होतं. या रथयात्रेनंतर अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. या प्रकरणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह 32 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. 1992 पासून  प्रलंबित असणाऱ्या या खटल्याचा निकाल आज विशेष सीबीआय न्यायालयाने दिला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. 

हेही वाचा - बाबरी मशिद प्रकरण - गेल्या 28 वर्षात काय घडलं?

या प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर सीबीआयचे विशेष न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव निवृत्त होतील. बाबरी प्रकरणाच्या निकालासाठी त्यांची निवृत्ती एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. आज पाच वाजता ते निवृत्त होणार आहेत.