Balakot Air Strike: 'बंदर मारा गया', एअर स्ट्राईकच्या 15 मिनिटांनी दिल्लीला फोन

balakot
balakot

नवी दिल्ली- भारत-पाकिस्तानमध्ये 1971 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारताने हवाई हल्ला करत बालाकोट एअर स्ट्राईक केला. यात जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कॅम्प नष्ट करण्यात आला होता. भारताने केलेल्या या हवाई हल्ल्याला आज 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. बालाकोटचा हवाई हल्ला, जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पुलवामा हल्लानंतर करण्यात आला होता. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. 

काय झालं होतं 26 जानेवारी 3.30 च्या रात्री?

26 फेब्रुवारी 2019 ला जवळपास तीन वाजता भारताच्या 12 मिराज 2000 लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करत पाकिस्तानातील बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कॅम्पंना उद्धवस्त केलं होतं. या हल्लामध्ये भारतीय वायुसेनेने मिराज-2000 सोबत सुखोई एसयू-30 लढाऊ विमानांचा वापर केला होता. वायुसेनेने केलेल्या या हल्ल्यामध्ये जैशचे जवळपास 300 दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला जातो. उरी आणि बालाकोट हवाई हल्ला, या दोन्ही हल्लांनी पाकिस्तानला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. 

का करावा लागला बालाकोट एअर स्ट्राईक?

भारताने 14 फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याला बालाकोट एअर स्ट्राईकने उत्तर दिले होते. जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याने विस्फोटकाने भरलेली कार जवानांच्या ताफ्याला नेऊन धडकवली. त्यानंतर भयानक स्फोट झाला आणि बसच्या चिंधड्या उडाल्या. परिणामी भारत देशाचे 40 शूर जवान हकनाक शहीद झाले. अनेक जवान जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची आणि धडा शिकवण्याची मागणी जोर धरु लागली. अखेर भारत सरकारने चुपचाप शहीदांवरील हल्ल्याचा बदला घेतला. 

सिक्रेट ठेवण्यासाठी नाव दिलं  ‘ऑपरेशन बंदर’

पुलवामा हल्ल्याला 12 दिवस झाल्यानंतर 26 फेब्रुवारीच्या रात्री भारताने मिराज-2000 लढाऊ विमानांच्या सहाय्याने हल्ला करण्याचे निश्चित केले. पण, पाकिस्तानला याची चाहूल लागू नये, यासाठी भारताने एक युक्ती केली होती. राजस्थानमध्ये सीमा भागात भारताने लढाऊ विमाने पाठवले. पाकिस्तानला याठिकाणी हालचाली दिसल्याने त्याने आपली लढाऊ विमाने आणि युद्ध सामग्री या भागात तैनात केली होती. याचवेळी भारताच्या मिराज-2000 लढाऊ विमानांनी  Spice 2000 बॉम्ब ज्याचे वजन 90 किलो होते, बालाकोटमधील जैशच्या कॅम्पवर टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे झालं असं की, बालाकोटवर हल्ला होत असताना पाकिस्तानचे लढाऊ विमाने याठिकाणाहून कमीतकमी 150 किलोमीटर दूर होते. 

3.45 मिनिटाला हवाईदल प्रमुख बीएस धनोआ यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना विशेष RAX क्रमांकावर कॉल करुन'बंदर मारा गया' असं सांगितलं. याचा अर्थ होता, बालाकोटमधील एअर स्ट्राईक यशस्वी झाला आहे. त्यानंतर डोवाल यांनी हल्ला यशस्वी झाल्याची माहिती पंतप्रधान मोदींना दिली होती. 'हिंदुस्तान टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com