बालगंधर्व यांचे चरित्र जागतिक पातळीवर जाणार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जुलै 2018

सुधेसारिखा स्वाद स्वर्गीय गाणे' असे वर्णन होणारे मराठी रंगभूमीचे नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांचे जीवनचरित्र आता जागतिक नाट्यरसिकांपर्यंत पोचणार आहे. मॉरिशसमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक हिंदी साहित्य परिषदेतही याचे प्रकाशन करावे, असा आग्रह भारत सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी धरला आहे. 

नवी दिल्ली- सुधेसारिखा स्वाद स्वर्गीय गाणे' असे वर्णन होणारे मराठी रंगभूमीचे नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांचे जीवनचरित्र आता जागतिक नाट्यरसिकांपर्यंत पोचणार आहे. मॉरिशसमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक हिंदी साहित्य परिषदेतही याचे प्रकाशन करावे, असा आग्रह भारत सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी धरला आहे. 

अभिराम भडकमकर यांनी लिहिलेल्या "बालगंधर्व' या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन आज दिल्लीत झाले. त्या वेळी सहस्रबुद्धे यांनी या प्रस्तावित प्रकाशनाचे जाहीर निमंत्रणच भडकमकर यांना दिले. या वेळी अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार, खासदार नरेंद्र जाधव व वसुंधरा जाधव, ज्येष्ठ रंगकर्मी रामगोपाल बजाज, दीपक करंजीकर, हिंदी अनुवादकार गोरख थोरात, राजकमल प्रकाशनाचे सत्यानंद निरूपम आदी उपस्थित होते. 

सहस्रबुद्धे म्हणाले, की रवींद्रनाथ टागोरांच्या "गीतांजली'नंतर भारतीय साहित्यकृतीला नोबेल मिळाले नाही यामागे मराठी साहित्य तेवढ्या मोठ्या प्रमाणात इंग्रजी व जागतिक भाषांत अनुवादित होत नाही हे एक ठळक कारण असावे. अनुवादक हा निव्वळ भाषांतरकारापेक्षा त्या विषयांची, त्या भाषेची व इतिहासाची सांस्कृतिक ओळखही करून देणारा असावा. 

कीर्ती शिलेदार यांनी गंधर्व नाटक मंडळींच्या आठवणी सांगितल्या. ही नाटक मंडळी हे गुरूकुल होते असे सांगून त्या म्हणाल्या, की संगीत नाटकात बालगंधर्वांनीच प्रथम ऑर्गन आणले. जीवन सुंदर करायचे तर सुंदरतेचा शोध स्वतः घेतला पाहिजे हे बालगंधर्वांनी मराठी समाजाला शिकविले. भडकमकर, बजाज, करंजीकर यांचीही भाषणे झाली.

Web Title: Balgandharvas character will be now global