भारतातील गुंतवणुकीवर परिणाम शक्‍य

पीटीआय
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

'अशा बंदीचा चीनच्या निर्यातीवर फारसा काहीही परिणाम होणार नाही. पण चिनी उत्पादनांसाठी पर्यायी वस्तू उपलब्ध नसताना या उत्पादनांवर बंदी घालण्याचा निर्णय भारतीय व्यापारी आणि ग्राहकांसाठीच तोट्याचा ठरेल,'

बीजिंग - दिवाळीत खरेदी करताना चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन भारतातील काही संस्था-संघटनांकडून होत असताना, चीनने ही बाब गंभीरपणे घेत भारताला इशारा दिला आहे. अशा घटनांमुळे चिनी कंपन्यांकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्‍यता असून, द्विपक्षीय संबंधातही तणाव येऊ शकतो, असे चीनने म्हटले आहे.

दिवाळीमध्ये अनेक चिनी बनावटीच्या वस्तूंची मोठी उलाढाल भारतात होत असते. सर्जिकल स्ट्राइकनंतर भारतात देशभक्तीची लाट उसळल्याने काही संघटनांनी चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. याबाबत चीनने एक निवेदन प्रसिद्ध करत काळजी व्यक्त केली आहे. "चिनी मालावर बहिष्कार घातल्याने चीनच्या निर्यातीवर परिणाम होणार नसून, योग्य पर्याय नसल्याने भारतीय कंपन्यांचे आणि ग्राहकांचेच नुकसान होणार आहे. वस्तू निर्यातीमध्ये चीन हा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार देश असून, 2015 मध्ये आमची निर्यात 2276 अब्ज डॉलर होती. यामध्ये भारतात केवळ दोनच टक्के निर्यात होते. त्यामुळे बहिष्कार घातल्यास आमच्यावर फारसा परिणाम होणार नाही; मात्र भारतीयांच्या या भावनेचा चिनी कंपन्यांवर परिणाम होऊन भारतातील त्यांची गुंतवणूक कमी होऊ शकते. तसेच, भारत-चीन संबंध बिघडण्याची शक्‍यता आहे. हे दोन्ही परिणाम दोन्ही देशांना मान्य होण्यासारखे नाहीत,' असे निवेदनात म्हटले आहे.

चीन हा भारताचा मोठा व्यापारी सहकारी असून, दोन्ही देशांमधील संबंध मैत्री आणि विश्‍वासाच्या आधारावर वाढायला हवेत, असे चीनने निवेदनात स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांमधील व्यापार मागील 15 वर्षांमध्ये 24 पटींनी वाढला असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

विक्रीत घट होण्याचा अंदाज
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याने पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीनवरही भारतीयांचा राग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चीनविरोधात आवाहन करण्याचे प्रमाण आहे. याचाच परिणाम म्हणून यंदाच्या दिवाळीत चिनी मालाच्या विक्रीत यंदा तीस टक्‍क्‍यांनी घट होण्याचा अंदाज कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेने व्यक्त केला आहे. चिनी वस्तू कमी किमतीत मिळत असल्यानेच त्यांचा भारतीय बाजारात मोठा शिरकाव झाला आहे. चिनी वस्तूंमध्ये खेळणी, फर्निचर, हार्डवेअर, फटाके, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, कापड, कार्यालयीन स्टेशनरी, विजेच्या माळा-बल्ब, स्वयंपाकघरातील वस्तू, भेटवस्तू, घड्याळे यांच्या खपाचे प्रमाण अधिक आहे.

Web Title: Ban on Chinese goods will have impact on ties with India, says China