बांगलादेशची चीनला विनंती; ‘वन चायना’ला पाठिंबा

रोहिंग्यांच्या घरवापसीसाठी मदत करा
रोहिंग्यां
रोहिंग्यांsakal

ढाका : बांगलादेशमध्ये रोहिंग्या मुस्लिमांमुळे अनेक समस्या निर्माण होत असून त्यांना म्यानमारमध्ये परत पाठविण्यासाठी चीनने सहकार्य करावे, अशी विनंती बांगलादेश सरकारने आज चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याकडे केली. वँग यी हे दोन दिवसांसाठी बांगलादेशमध्ये आले होते. तैवान मुद्द्यावरून वाद सुरु असताना बांगलादेशने चीनच्या ‘वन चायना’ धोरणाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

म्यानमारमधील लष्कराच्या अत्याचारांना कंटाळून देश सोडून गेलेल्या लाखो रोहिंग्या मुस्लिमांपैकी सात लाखांहून अधिक जण बांगलादेशमध्ये आश्रयाला आले आहेत. या रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारमध्ये परत पाठविण्यासाठी चीनने आपला प्रभाव वापरून नोव्हेंबर २०१७ मध्ये म्यानमार आणि बांगलादेशमध्ये करार घडवून आणला होता. मात्र, हा करार होऊनही बहुतांश रोहिंग्या मुस्लिमांनी मायदेशी अत्याचार होण्याच्या भीतीने परत जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बांगलादेशात गुन्हेगारी आणि बेरोजगारी वाढण्याबरोबरच अनेक समस्या निर्माण होत आहेत. बांगलादेशमध्ये आलेल्या वँग यी यांनी पंतप्रधान शेख हसीना आणि परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी मोमेन यांनी त्यांच्यासमोर रोहिंग्या मुस्लिमांना परत पाठविण्यास मदत करण्याची विनंती केली.

व्यापार करमुक्त

बांगलादेशकडून चीनला निर्यात होणाऱ्या करपात्र वस्तूंपैकी

९८ टक्के वस्तू एक सप्टेंबरपासून करमुक्त केल्या जातील,

अशी घोषणा चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी आज केली. याशिवाय, बांगलादेशकडून विविध प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंच्या निर्यातीलाही प्रोत्साहन असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, पायाभूत सुविधा, औद्योगिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, फाइव्ह जी सेवा, स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांचा अधिक विकास करण्यासाठी मदत करण्याचे आश्‍वासनही वँग यी यांनी बांगलादेश सरकारला दिले.

बांगलादेश आणि चीनदरम्यान अत्यंत चांगले राजनैतिक आणि व्यापारी संबंध आहेत. बांगलादेशात पाचशेहून अधिक चिनी कंपन्या कार्यरत आहेत. बांगलादेशमधील बंदरविकास, भुयारी मार्ग, महामार्ग बांधणी यासह बहुतेक सर्व मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्ये चीनचा सहभाग आहे. पद्मा नदीवर चीनने साडे तीन अब्ज डॉलर बांधून उभारलेला पूल हा बांगलादेशमधील सर्वांत मोठा पूल आहे. शेख हसीना या २००८ मध्ये सत्तेत आल्या त्यावेळी त्यांनी चीनच्या विनंतीवरून ढाक्यातील तैवानचे वाणिज्य कार्यालय बंद केले होते. बांगलादेशमधील वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com