बॅंक ग्राहकांची सुरक्षा रामभरोसे ! 

अभय दिवाणजी
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजारच्या नोटाबंदीच्या घोषणेला आता जवळपास 36 दिवसांचा कालावधी लोटला. या घोषणेचे सर्वस्तरातून स्वागतच झाले. परंतु सर्वसामान्य नागरिकांना चटके सहन करावे लागत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था तर पूर्णतः कोसळलीच आहे. यात भरीस भर म्हणून एटीएमच्या किंवा बॅंकेसमोर लागलेल्या रांगेत उभारलेल्यांच्या मृत्यूची संख्या वाढत असल्याने टिकाकारांना आयते कोलीत मिळत आहे. सोलापुरात बॅंकेसमोर लागलेल्या रांगेत कार घुसल्याने तीन महिलांसह चौदाजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजारच्या नोटाबंदीच्या घोषणेला आता जवळपास 36 दिवसांचा कालावधी लोटला. या घोषणेचे सर्वस्तरातून स्वागतच झाले. परंतु सर्वसामान्य नागरिकांना चटके सहन करावे लागत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था तर पूर्णतः कोसळलीच आहे. यात भरीस भर म्हणून एटीएमच्या किंवा बॅंकेसमोर लागलेल्या रांगेत उभारलेल्यांच्या मृत्यूची संख्या वाढत असल्याने टिकाकारांना आयते कोलीत मिळत आहे. सोलापुरात बॅंकेसमोर लागलेल्या रांगेत कार घुसल्याने तीन महिलांसह चौदाजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. पंतप्रधानांनी नोटाबंदीनंतर सारे काही सुरळीत होण्यासाठी 50 दिवस वाट पाहण्यास सांगितले आहे. त्यातील 36 दिवस संपले. परंतु बॅंकेसमोर उभारलेला ग्राहकाची सुरक्षा मात्र या कालावधीत "रामभरोसे'च राहिली आहे. 

बॅंकेसमोर रांगेत उभारलेल्यांना देशभक्तांचा दर्जा द्या, त्यातील मरण पावलेल्यांना शहिदांप्रमाणे भरपाई द्या, अशाही मागण्या या निमित्ताने पुढे येत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर कधी नव्हे इतकी बॅंक आणि बॅंक कर्मचाऱ्यांची महती वाढली आहे. बॅंकेसमोरील रांगा 36 दिवसानंतरही कमी होत नाहीत. सोलापुरातून तब्बल 3200 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बॅंकेत जमा झाल्या आहेत. जुन्या नोटा जमा करण्यासाठी, दवाखाना, बाळंतपण, कॉलेजची फी भरणे, प्रवास अशा वेगवेगळ्या परंतु महत्त्वाच्या ठरणाऱ्या कारणांसाठी पैसे काढण्याकरीता बॅंकांसमोर गर्दीचे चित्र आहे. सर्वच बॅंका व एटीएम केंद्रे रस्त्यालगतच असल्याने या रांगा थेट रस्त्यावरच येत आहेत. काही बॅंकांच्या एटीएममध्ये दिवसाकाठी 20 ते 25 लाख रुपयांची रोकड भरली जाते. दोन-तीन तासात ती संपूनही जाते. एखाद्या गोष्टीची कमतरता पडणार म्हटल्यावर त्याची साठवणूक करण्याची मानवी प्रवृत्ती असल्याने चालूस्थितीत असलेल्या एटीएमसमोर भल्या मोठ्या रांगा दिसत आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर तीन आठवडे गर्दी होती, परंतु बॅंकेत खात्यावर निवृत्तीवेतन, वेतन जमा झाल्यानंतर म्हणजे एक डिसेंबरपासून या रांगाचे शेपूट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे या रांगांनी थेट रस्ताच काबीज केल्याचे चित्र दिसत आहे. 
सुरवातीला रांग लावण्याच्या कारणावरून भांडणे होऊ लागली. तेव्हा काही बॅंकांजवळ पोलिस बंदोबस्त लावला गेला. परंतु नंतर रांगा रस्त्यावर आल्या तरी त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा बॅंकेने अथवा तत्सम यंत्रणांनी दिली नाही. सुरवातीच्या काळात काही सामाजिक संघटना अथवा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चहा-पानाची सोय केली. परंतु नोटाबंदीवर काही जालीम इलाज होत नाही, या रांगा हनुमानाच्या शेपटीगत वाढतच जात असल्याचे चित्र दिवसेंदिवस वाढतच चालल्याने त्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे या ग्राहकांना कोणी वालीच राहिला नाही. शनिवारपासून तीन दिवस बॅंकांना सुट्टी असल्याने शुक्रवारी या गर्दीत आणखी वाढ झाली. त्या दिवशीच्या (ता. 8) सोलापुरातील घटनेने तर कहरच केला. सहा आसनी रिक्षा चालविणाऱ्या एका चालकाने बॅंकेसमोरील एका बंगल्यातून कार काढली. ब्रेकऐवजी त्याने थेट एक्‍सलेटरवर पाय ठेवल्याने कारने सुसाट वेग घेतला. समोरच रस्त्यावर उभ्या असलेल्या रांगेत ती घुसली. या विचित्र अपघाताने बॅंक ग्राहकांच्या सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बॅंक कर्मचारी संघटनेनेही या प्रकरणात लक्ष घातले आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी दस्तुरखुद्द महाराष्ट्र राज्य बॅंक एम्प्लॉईज फेडरेशननेही केली आहे. त्यांनी शासनाने ही भरपाई द्यावी, असे म्हटले आहे. नोटाबंदीचे एकीकडे स्वागत होत असले तरी हा विषय राजकीय पटलावर सध्या हल्लाबोलचा झाला आहे. राजकीय भांडवल काहीही होवो परंतु ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बॅंकांनी व शासनाने तातडीने उपाय योजावेत असे मात्र वाटू लागले आहे. 

Web Title: Bank customers trust the security ?