बॅंक कर्मचाऱ्यांचा विलनीकरणाच्या विरोधात देशव्यापी संप

वृत्तसंस्था
शनिवार, 1 डिसेंबर 2018

बॅंक कर्मचारी संघटनांनी 26 डिसेंबरला देशव्यापी बंद पुकारला आहे. बॅंक ऑफ बडोदा, देना बॅंक आणि विजया बॅंक यांच्या प्रस्तावित विलीनीकरणाला संघटनांनी विरोध केला आहे.
 

नवी दिल्ली- बॅंक कर्मचारी संघटनांनी 26 डिसेंबरला देशव्यापी बंद पुकारला आहे. बॅंक ऑफ बडोदा, देना बॅंक आणि विजया बॅंक यांच्या प्रस्तावित विलीनीकरणाला संघटनांनी विरोध केला आहे.

केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदा, देना बॅंक आणि विजया बॅंक या तीन बॅंकांचे विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला सप्टेंबरमध्ये मंजुरी दिली आहे. बॅंक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या नऊ संघटनांची शिखर संघटना असलेल्या "युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स'ने (यूएफबीयू) हा संप पुकारला आहे. केंद्र सरकार आणि संबंधित बॅंकांनी विलीनीकरणाच्या दिशेने पुढे पावले टाकली आहेत. यामुळे आम्ही संप करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती "ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन'चे सरचिटणीस सी. व्ही. वेंकटचलम यांनी दिली.

"यूएफबीयू'च्या अंतर्गत असणाऱ्या सर्व संघटना संपात सहभागी होतील, असे "नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बॅंक वर्कर्स'चे अध्यक्ष अश्‍वनी राव यांनी सांगितले. सरकारने विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर संबंधित तिन्ही बॅंकांच्या संचालक मंडळांनी विलनीकरणाला मंजुरी दिली आहे.

विलीनीकरण होणाऱ्या बॅंका 
- बॅंक ऑफ बडोदा 
- देना बॅंक 
- विजया बॅंक 

तिन्ही बॅंकांचा एकत्रित व्यवसाय 
- 14.82 लाख कोटी रुपये 

Web Title: Bankers To Go On Strike On December 26 To Oppose The Big Bank Merger