सहा महिन्यांतील जमेची माहिती द्या

पीटीआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

बॅंका, सहकारी बॅंका आणि टपाल कार्यालयांनी 1 एप्रिल ते 9 नोव्हेंबर या काळात जमा झालेल्या रोख रकमांचे तपशील द्यावयाचे आहेत. सर्व बॅंकांनी खातेधारकांकडून पॅन क्रमांक आणि फॉर्म 60 भरून घ्यावा. पॅन क्रमांक बंधनकारक असलेल्या व्यवहारांसाठी तो नोंदवावा.

 

नवी दिल्ली - बॅंकांमध्ये जमा होणाऱ्या रोख रकमेची तपासणी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने सर्व बॅंकांकडून नोटाबंदीच्या आधीचे सहा महिने म्हणजेच 1 एप्रिल ते 9 नोव्हेंबरदरम्यान बचत खात्यांमध्ये जमा झालेल्या रोख रकमांचे तपशील मागविले आहेत.

खातेधारकांनी पॅन क्रमांक दिला नसल्यास अथवा फॉर्म 60 खाते उघडताना भरला नसल्यास त्यांच्याकडून हे दोन्ही 28 फेब्रुवारीपर्यंत मागून घ्यावेत, असे निर्देशन प्राप्तिकर विभागाने बॅंकांना दिले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिसूचनेनुसार, बॅंका, सहकारी बॅंका आणि टपाल कार्यालयांनी 1 एप्रिल ते 9 नोव्हेंबर या काळात जमा झालेल्या रोख रकमांचे तपशील द्यावयाचे आहेत. सर्व बॅंकांनी खातेधारकांकडून पॅन क्रमांक आणि फॉर्म 60 भरून घ्यावा. पॅन क्रमांक बंधनकारक असलेल्या व्यवहारांसाठी तो नोंदवावा. खाते उघडताना पॅन क्रमांक न देणाऱ्या आणि फॉर्म 60 न भरणाऱ्या खातेधारकांकडून ते 28 फेब्रुवारीपर्यंत घ्यावेत. पॅन क्रमांक नसलेल्या व्यक्तीकडून फॉर्म 60 हा घोषणापत्राच्या स्वरूपात भरून घेण्यात येतो.

याआधी प्राप्तिकर विभागाने नोटाबंदीनंतर बचत खात्यांमधील अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आणि चालू खात्यात साडेबारा लाखांपेक्षा अधिक जमेची माहिती सर्व बॅंकांकडून मागविली होती. ही माहिती 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीतील मागविण्यात आली होती. तसेच, एका दिवसात 50 हजार रुपयांपेक्षा अधिक एका खात्यात जमा झाले असल्यास त्याचेही तपशील मागविले होते.

पंधरा लाख कोटींच्या जुन्या नोटा जमा
पाचशे व हजारच्या रद्द नोटांपैकी सुमारे 15 लाख रुपयांच्या नोटा बॅंकिंग यंत्रणेत परत आल्या आहेत. प्राप्तिकर विभागाने त्यामुळे बॅंकांतील जमेची तपासणी सुरू केली आहे. प्राप्तिकर विभाग बॅंकांमधील आधी झालेली रोख जमा आणि नोटाबंदीनंतर झालेली रोख जमा याची पडताळणी करणार आहे.

Web Title: banks to report pre-demonetization cash deposits