VIDEO - केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अजित दादांकडून शिकावं; सुप्रिया सुळेंचा सल्ला

टीम ई सकाळ
Thursday, 11 February 2021

सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची तुलना केली. यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांकडून काहीतरी शिकावं असाही सल्ला दिला.

नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संसदेतील भाषणाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. लोकसभेत अर्थसंकल्पावरील भाषणावेळी सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची तुलना केली. यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांकडून काहीतरी शिकावं असाही सल्ला दिला. सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडून राज्याला जीएसटी दिला गेला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसंच खासदारांच्या निधीत करण्यात आलेल्या कपातीच्या मुद्द्यावरून त्यांनी खोचक टीकाही केली. 

खासदारांच्या निधीत कपात
खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषणावेळी मोदी सरकारने खासदारांचे 12 कोटी रुपये कापल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, मला तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशातील प्रत्येक खासदाराकडून बारा कोटी घेतले. यातही खासदारांना न विचारता परस्पर निर्णय़ घेतला गेला. आता लोकांकडून आम्हाला विचारणा होते की, एमपीलॅड फंड द्या. हा फंड तर मोदीजी घेऊन गेले, कसा द्यायचा. पुढची अडीच वर्षे काहीच करता येणार नाही.

राज्यात आमदारांना निधी
दरम्यान, याउलट राज्यात चारही पक्षातील एकाही आमदाराकडून काहीच घेतलं गेलं नाही. तर विरोधीपक्षातल्या आमदारासह सर्वांना दरवर्षी पाच कोटींचा निधी मिळेल याचं नियोजन राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलं आहे. हाच भारताचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांमधील फरक आहे. दोन कोटीसुद्धा दिला आणि तीन कोटीही दिले. निधीत कसलीच कपात केली नाही. केंद्राकडून जीएसटी येत नाहीय, तरीही राज्याने योग्य नियोजन केलं असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

हे वाचा - शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींचं मौन; सत्ताधाऱ्यांकडून मात्र 'शेम-शेम'च्या घोषणा

केंद्राच्या अर्थमंत्र्यांनी अजित पवारांकडून शिकावं
केंद्राकडून जीएसटी न येणं, खासदारांच्या निधीत कपात असं सुरु असताना राज्यात मात्र आमदारांच्या निधीचं योग्य नियोजन केल्याचं सांगत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर संसदेत कौतुकाचा वर्षाव केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला वाटतं, तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून काहीतरी शिकावं, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. लोकांकडून चांगल्या आयडिया घेणं ही चांगली बाब असते असा सल्लाही त्यांनी संसदेत दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baramati mp supriya sule appriciate ajit pawar in parliament during budget session speech