
राहुल गांधींसह विरोधी पक्षांच्या खासदारांनी मौन बाळगलं तेव्हाही सत्ताधारी पक्षातील खासदारांकडून गोंधळ सुरुच होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आवाज करणाऱ्या खासदारांना शांत राहण्यास सांगत होते.
नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला संसदेत धारेवर धरलं. राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषणावेळी कृषी कायद्यांमुळे केवळ धनदांडग्यांचा फायदा होत असल्याचं म्हटलं. तसंच मोदी सरकार हे हम दो हमारे दो असून फक्त चारच लोक देश चालवत असल्याचंही ते म्हणाले.
लोकसभेत राहुल गांधींनी कृषी कायद्याविरोधात आक्रमक शैलीत बाजू मांडली. तेव्हा शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी दोन मिनिटांचे मौनही बाळगले. राहुल गांधी कृषी कायद्याविरोधात बोलत असल्यानं आधीपासूनच त्यांच्या भाषणावेली गोंधळ सुरु होता. जेव्हा राहुल गांधींसह विरोधी पक्षांच्या खासदारांनी मौन बाळगलं तेव्हाही सत्ताधारी पक्षातील खासदारांकडून गोंधळ सुरुच होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आवाज करणाऱ्या खासदारांना शांत राहण्यास सांगत होते.
मौन बाळगण्याचं आवाहन करताना राहुल गांधी म्हणाले होते की, जे 200 शेतकरी हुतात्मा झाले त्यांना या लोकांनी श्रद्धांजली वाहिली नाही. मी माझ्या भाषणानंतर दोन मिनिटं मौन पाळेन, तुम्हीही माझ्यासोबत उभा राहा. राहुल गांधी त्यानंतर शांतपणे उभा राहिले आणि सोबत काँग्रेससह त्यांच्या सहकारी पक्षांचे खासदारही उभा होते. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली. तरीही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी शेम शेम अशा घोषणा दिल्या.
हे वाचा - मोदी सरकार म्हणजे हम दो, हमारे दो; राहुल गांधींचा हल्लाबोल
राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर काहीच भाष्य केलं नाही. ते म्हणाले की, विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनावर चर्चेची मागणी केली होती. सरकारने ही मागणी मान्य केली नाही. सरकारने म्हटलं की, फक्त अर्थसंकल्पावर आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होईल. यासाठी सरकारच्या या निर्णयाचा मी विरोध करत असून अर्थसंकल्पावर काहीच भाष्य करणार नाही.
लोकसभेत राहुल गांधी यांनी जवळपास 10 मिनिटे भाषण केलं. यामध्ये त्यांनी शेतकरी आणि कामगारांवर मत मांडले. यावेळी सातत्यानं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून अर्थसंकल्पावर बोला असं ऐकवण्यात आलं. राहुल गांधींनी यावर बोलणार आहे असं सांगितलं. मात्र त्यानंतरही त्यांनी शेतकरी आंदोलन आणि कोरोनाच्या संकटात मजुरांचे झालेले हाल यावरच चर्चा केली.
हे वाचा - प्रियांका गांधींचे नमामी गंगे! मौनी अमावस्येला प्रयागराज संगमावर स्नान
मजुरांबाबत काँग्रेसचा राज्यसभेतही हल्लाबोल
अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना चिदंबरम म्हणाले की, गेली साडेतीन चार वर्षे तुमच्या सरकारच्या ‘टोकाच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाची फळे देश आज भोगत आहे. लॉकडाउन ६ महिन्यांपूर्वी संपला तरी आज किमान २८ दशलक्ष लोक रोजगाराच्या शोधात वणवण करत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.