esakal | चॅनेल्सच्या टीआरपींवर तीन महिन्यांसाठी स्थगिती; यंत्रणा अधिक निर्दोष करण्याची ग्वाही
sakal

बोलून बातमी शोधा

BARC & republic

सध्या टीआरपी मूल्यमापनासाठी वापरली जाणारी यंत्रणा आणि पद्धत अधिकाधिक निर्दोष व्हावी, यादृष्टीने काय प्रयत्न करता येतील याचा आढावा बार्कद्वारे घेण्यात येणार आहे. 

चॅनेल्सच्या टीआरपींवर तीन महिन्यांसाठी स्थगिती; यंत्रणा अधिक निर्दोष करण्याची ग्वाही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून देशात सुरु असणाऱ्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या एकूण कार्यपद्धतीबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उठवले जात आहे. अशातच मुंबई पोलिसांनी टीआरपी रेटींगमध्ये घोटाळा होत असून त्यासंदर्भात आम्ही अधिक तपास करुन कारवाई करणार असल्याची माहिती दिली होती. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलने (BARC) एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. बार्कने या वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवरच तीन महिन्यांसाठी स्थगिती आणली आहे. 

सध्या टीआरपी मूल्यमापनासाठी वापरली जाणारी यंत्रणा आणि पद्धत अधिकाधिक निर्दोष व्हावी, यादृष्टीने काय प्रयत्न करता येतील याचा आढावा यादरम्यान घेण्यात येणार असल्याचे बार्कचे चेअरमन पुनित गोयंका यांनी सांगितले. बार्कने योग्य निर्णय घेतला असल्याचे म्हणत न्यूज ब्रॉडकास्टींग असोशिएशनने या निर्णयाचं स्वागतच केलं आहे. 

हेही वाचा - 'दिल्ली प्रदूषणात पंजाबमध्ये जाळल्या जाणाऱ्या पेंढ्याचा वाटा'; राजधानी पुन्हा 'काळवंडली'

ही स्थगिती तीन महिन्यांसाठी आणली गेली आहे. या निर्णयाअंतर्गत हिंदी, प्रादेशिक आणि इंग्रजी अशा सर्वच न्यूज आणि बिझनेस न्यूज चॅनेलच्या आठवड्याभराच्या टीआरपी रेटींगवर स्थगिती आणली आहे. मात्र, दर आठवड्याला राज्यनिहाय आणि भाषानिहाय दर्शकांचा अंदाज बार्कद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. 

भारतात नेमकं काय  पाहिलं जातंय याची माहीती आम्ही खरेपणाने आणि विश्वासाने बार्कद्वारे जाहीर करु. टीआरपी रेटींग जाहीर करतानाची महत्वाची जबाबदारी आम्ही पार पाडू, असं बार्कचे सीईओ सुनिल लुल्ला यांनी म्हटलं. 

कोणते टेलीव्हीजन चॅनेल किती काळ पाहीलं जातं याची माहीती बार्कद्वारे ब्रॉडकास्टर्स, जाहीरातदार आणि जाहीरात एजन्सी यांना पुरवली जाते. बार्क ही टीव्ही चॅनेल्सच्या दर्शकतेचे मोजमाप करणारी जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. ही संस्था मुंबईमध्ये असून 2010 साली याची स्थापना करण्यात आली होती. 

हेही वाचा - रेल्वेने प्रवास करताय? नियमांचा भंग कराल तर गजाआड व्हाल

दरम्यान, रिपब्लीक टीव्हीने टीआरपी घोटाळ्यासंदर्भातील आपली याचिका आधी मुंबई हायकोर्टात दाखल करावी अशी सुचना सुप्रिम कोर्टाने त्यांना दिली आहे. या टीआरपी प्रकरणासंदर्भात रिपब्लिक टीव्हीचे चिफ फायनान्शियल ऑफिसर शिवा सुंदरम यांनी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलला बजावलेल्या समन्सला सुप्रिम कोर्टात आव्हान दिले होते. सध्या मुंबई पोलिस टीआरपी घोटाळ्यासंदर्भात रिपब्लिक चॅनेल, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या तीन चॅनेलची चौकशी करत आहे.