रेल्वेने प्रवास करताय? नियमांचा भंग कराल तर गजाआड व्हाल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

आरपीएफने येणाऱ्या सण-समारंभाच्या पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीत रेल्वेने हे नियम लागू केले असल्याची माहिती दिली आहे. 

नवी दिल्ली : देशात अनलॉकची प्रक्रिया हळूहळू होत असतानाच आता रेल्वेसेवा सुरु करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे. मात्र, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन ही सेवा चालू ठेवण्याची जबाबदारी मुख्यत: प्रशासनावर असणार आहे. यासाठी प्रवाशांनी योग्य ती खबरदारी घ्यावी म्हणून त्यांच्यासाठी एक नियमावली आता रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. 

मास्कचा वापर न करणे, कोविड-19 शी निगडीत नियमांचे पालन न करणे आणि कोरोना संक्रमित असतानाही रेल्वेतून प्रवास करणे या प्रकारच्या वर्तनासाठी प्रवाशांवर रेल्वेच्या अधिनियमांनुसार वेगवेगळ्या कलमांअंतर्गत कारवाई होऊ शकते. या कारवाईमध्ये दंड तसेच तुरुंगवास देखील होऊ शकतो. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) म्हणजेच रेल्वे सुरक्षा बलाने बुधवारी ही माहिती दिली. आरपीएफने येणाऱ्या सण-समारंभाच्या पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीत रेल्वेने हे नियम लागू केले असल्याची माहिती दिली आहे. 

हेही वाचा - Bihar Election : काँग्रेसचे 'ब्राह्मण' कार्ड तर 'सुशांत'च्या चुलत भावाला भाजपकडून तिकीट

याप्रकारच्या वर्तनासाठी होऊ शकतो तुरुंगवास
जाहीर केलेल्या नियमांमध्ये रेल्वेच्या परिसरात काही गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे. दिलेल्या सुचनांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. यामध्ये मास्क न घालणे, फिजीकल डिस्टंन्सिंगचे पालन न करणे आणि कोरोना संक्रमित असातानाही स्टेशनवर येणे आणि रेल्वेतून प्रवास करणे या गोष्टींसाठी शिक्षा होऊ शकते. आरपीएफने म्हटलंय की सार्वजनिक ठिकाणी थुंकणेदेखील कायद्याने गुन्हा असणार आहे. 

कोरोना पसरवणाऱ्या गोष्टी करु नयेत
रेल्वे स्टेशनवर अथवा रेल्वेमध्ये अस्वच्छता करणे अथवा  प्रशासनाने दिलेल्या सुचना न पाळता कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत ठरणारे कृत्य करणे हा गंभीर गुन्हा असणार आहे. या सगळ्या कृत्यास मनाई असणार आहे. आरपीएफने आपल्या एका वक्तव्यात म्हटलंय की अशाप्रकारची कृत्ये कोरोनाच्या संक्रमणास वाढवू शकतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी ही कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. जर हे पाळले गेले नाहीत तर रेल्वेच्या अधिनियमांनुसार कलम 145, 153 आणि 154 अंतर्गत आपल्याला शिक्षा होऊ शकते. 

हेही वाचा - 'दिल्ली प्रदूषणात पंजाबमध्ये जाळल्या जाणाऱ्या पेंढ्याचा वाटा'; राजधानी पुन्हा 'काळवंडली'

काय आहे शिक्षेचं स्वरुप
रेल्वे अधिनियमांच्या कलम 145 नुसार नशा करणे अथवा उपद्रव करणे या गुन्ह्याअंतर्गत जास्तीतजास्त एक महिन्याची कैद होऊ शकते तसेच कमीतकमी 250 रुपयांचा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही शिक्षा एकत्रपणे होऊ शकतात. 
कलम 153 नुसार जाणूनबुजून इतर प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी जास्तीतजास्त पाच वर्षे आणि कलम 154 अंतर्गत बेजबाबदार वर्तनाने इतरांच्या जीवाशी खेळणे या गुन्ह्याअतंर्गत एक वर्षांची कैद होऊ शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid19 norms by railway should be followed or else can lead to fine & jail