बरेलीच्या मतदार यादीतून प्रियांकाचे नाव वगळले

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

मिस वर्ल्ड पुरस्कार जिंकल्यानंतर प्रियांकाचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले होते. मात्र, त्यानंतर तब्बल सतरा वर्षे प्रियांका आणि तिच्या आईचे नाव बरेलीतील वॉर्ड क्रमांक 56च्या मतदार यादीत होते. स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.

बरेली (उत्तर प्रदेश): बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर हॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचे नाव बरेलीच्या मतदार यादीतून वगळण्यास जिल्हा प्रशासनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. प्रियांका आणि तिचे कुटुंबीय मुंबईमध्ये स्थलांतरित झाल्याच्या घटनेला सतरा वर्षे झाली आहेत. त्यामुळे तब्बल सतरा वर्षांनंतर प्रियांका आणि तिची आई मधू चोप्रा यांची नावे बरेलीच्या मतदार यादीतून वगळण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मिस वर्ल्ड पुरस्कार जिंकल्यानंतर प्रियांकाचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले होते. मात्र, त्यानंतर तब्बल सतरा वर्षे प्रियांका आणि तिच्या आईचे नाव बरेलीतील वॉर्ड क्रमांक 56च्या मतदार यादीत होते. स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. त्यानंतर प्रशासनाने याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. गटस्तरीय अधिकाऱ्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रियांका आणि तिच्या आईचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले असल्याचे जिल्हा दंडाधिकारी आर. विक्रम सिंह यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, प्रियांकाचे वडील दिवंगत अशोक चोप्रा यांनी 2012मध्ये आपले कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले असल्याची माहिती एका पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाला दिली होती. प्रियांकाचे बरेलीच्या रेल्वे स्थानकाजवळ असलेले घर मागील अनेक वर्षांपासून बंद आहे.

Web Title: bareilly news Priyanka's name omitted from Bareilly voter list