'राहुल गांधी काँग्रेसचे नेतृत्त्व करण्यास अपात्र'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

'राहुल गांधी पक्षातील नेत्यांच्या प्रश्‍नाला उत्तर देण्याचे का टाळतात? जे नेते प्रश्‍न विचारतात त्यांच्या बैठकीत जाण्यास राहुल गांधी का लाजतात?', असे प्रश्‍न उपस्थित करत ते काँग्रेसचे नेतृत्त्व करण्यास अपात्र असल्याची टीका सिंह यांनी केली आहे.

दिल्ली - काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्या बरखा शुक्‍ला सिंह यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ते पक्षाचे नेतृत्त्व करण्यासाठी मानसिकदृष्ट्या अपात्र असल्याची टीका त्यांनी ट्‌विटरद्वारे केली आहे. मात्र, त्यानंतर सिंह यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

'राहुल गांधी आणि अजय माकन यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या सुरक्षेशी काहीही देणेघेणे नसून ते केवळ मतांसाठी या मुद्याचा वापर करतात, हे सांगताना मला खेद वाटतो. अजय माकन हे केवळ माझ्यासाठी नव्हे तर दिल्ली महिला काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन करतात. हा प्रकार मी ज्यावेळी राहुल गांधी यांना सांगितला त्यावेळी त्यांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केला. या अशा प्रकारांमुळे काँग्रेसमधील पाच जिल्हाध्यक्षांनी आणि 75 विभाग प्रमुखांनी राजीनामे दिले आहेत', अशी टीका सिंह यांनी केली.

'राहुल गांधी पक्षातील नेत्यांच्या प्रश्‍नाला उत्तर देण्याचे का टाळतात? जे नेते प्रश्‍न विचारतात त्यांच्या बैठकीत जाण्यास राहुल गांधी का लाजतात?', असे प्रश्‍न उपस्थित करत ते काँग्रेसचे नेतृत्त्व करण्यास अपात्र असल्याची टीका सिंह यांनी केली आहे. 'पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाही राहुल गांधी हे मानसिकदृष्ट्या काँग्रेसचे नेतृत्त्व करण्यास अपात्र असल्याचे वाटते. मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही', अशी टीकाही त्यांनी केली आहे.

राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल बरखा शुक्‍ला सिंह यांना सहा वर्षे पक्षातून निलंबित केले आहे.

Web Title: Barkha Shukla Singh, Who Said Rahul Gandhi 'Unfit To Lead' Congress, Expelled