वाढत्या तापमानामुळे बॅटरीत बिघाड

नितीन गडकरी : कंपन्यांनी सदोष वाहने माघारी घ्यावीत
Nitin Gadkari
Nitin Gadkari sakal

नवी दिल्ली : देशातील अनेक ठिकाणांवर इलेक्ट्रिक दुचाकींना आगी लागण्याच्या घटना उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने सावध भूमिका घेतली आहे. या दुचाकींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आधीच सदोष वाहने माघारी घ्यावीत तसेच वाढत्या तापमानाचाही गांभीर्याने विचार करावा असे सरकारने म्हटले आहे. मार्च, एप्रिल आणि मेमध्ये तापमानात मोठी वाढ होते अशा स्थितीत बॅटरीवर चालणाऱ्या या वाहनांमध्ये तांत्रिक दोष निर्माण होतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

देशातील इलेक्ट्रिक वाहनांचा उद्योग आता कोठे सुरू झाला असून त्यामध्ये अडथळे आणण्याचा सरकारचा विचार नाही पण लोकांच्या सुरक्षेलाही आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही असे गडकरींनी स्पष्ट केले. ते येथे आयोजित रायसीना डायलॉगमध्ये बोलत होते. मध्यंतरी देशाच्या अनेक भागांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींना आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या यामध्ये काहीजण मृत्युमुखी पडले होते तर काहींना गंभीर दुखापत देखील झाली होती. या घटनांच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी केलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जाते.

म्हणून बॅटरीमध्ये समस्या

गडकरी म्हणाले, ‘‘ कंपन्या आधीच सदोष वाहने बाजारपेठांतून माघारी घेऊ शकतात. आपल्याकडे मार्च- एप्रिल-मे मध्ये उष्णता अधिक असते, त्यामुळे बॅटरीमध्ये काही समस्या निर्माण होतात. सध्या दुचाकींना आगी लागण्याच्या घटना या वाढत्या तापमानामुळेच घडत असाव्यात असे मला वाटते. इलेक्ट्रिक वाहने लोकप्रिय करण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरीसुद्धा लोकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.’’

चीनमधील मोटार भारतात नको

अमेरिकास्थित टेस्ला कंपनीला भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहने तयार करायची असतील तर त्याला आमचा कोणताही आक्षेप नाही पण या कंपनीने चीनमधून येथे मोटार आणता कामा नये, असे गडकरी यांनी नमूद केले. ‘भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मोठी बाजारपेठ असून येथे मुबलक संधी उपलब्ध आहेत. एलॉन मस्क यांना भारतामध्ये वाहनांची निर्मिती करायची असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो; पण चीनमध्ये उत्पादन करून त्यांना ते भारतामध्ये विकायचे असेल तर मात्र त्याला आमचा आक्षेप आहे,’ असे गडकरींनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com