‘आत्मनिर्भर’संशोधन यशाच्या दिशेने;संपूर्ण स्वदेशी कोव्हॅक्सिन तयार केल्याचा दावा

covacin
covacin

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या देशभरात रोज विक्रमी संख्येने वाढत असतानाच यावरील लस शोधण्यात भारतीय वैज्ञानिकांना यश आले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या सहकार्याने ‘बीबीव्ही १५२-कोविड व्हॅक्सिन’(कोव्हॅक्सिन) ही पूर्णपणे स्वदेशात बनविलेली लस तयार केल्याचा दावा केला आहे. नागपूर व गोव्यासह देशातील १२ संस्थांमध्ये याच्या सर्व चाचण्या पूर्ण करून येत्या स्वातंत्र्यदिनी या लसीचा कोरोनाग्रस्तांवर प्रत्यक्ष उपयोग करण्यास प्रारंभ करण्याचे प्रयत्न आहेत, असे ‘आयसीएमआर’ने आज जाहीर केले. 

जगभरात शंभराहून जास्त लसींवर काम सुरू आहे. काही ठिकाणी मानवी चाचण्यांनाही सुरूवात झाली आहे. मात्र आतापर्यंत व्यावसायिक वापर करण्यासाठी एकाही लसीला मान्यता मिळालेली नाही. ‘आयसीएमआर’चे अध्यक्ष बलराम भार्गव यांनी संबंधित संस्थांना पत्र लिहून प्रयोगशाळेतील चाचण्या गतिमान करण्याची सूचना केली आहे. या लसीच्या देशातील पहिल्या मानवी चाचण्यांसाठी भुवनेश्‍वरच्या ‘इन्स्टिटूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड एसयूएस’ या संस्थेची निवड करण्यात आली आहे. 

देशभरातील संस्थांची निवड
नव्या कोरोना लसीच्या चाचण्या (क्‍लिनिकल ट्रायल्स) युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार असून त्यासाठी देशभरातील विविध संस्थांची निवड करण्यात आली आहे. नवी दिल्ली, विशाखापट्ट‌ण, पाटणा, बेळगाव, नागपूर, गोरखपूर, हैदराबाद, आर्यनगर, कानपूर, गोवा व तमिळनाडूतील कट्टनकुलथुर येथील संस्थांचा त्यात समावेश आहे. त्यांना चाचण्या पूर्ण करण्यास कालमर्यादा आखून देण्यात आली आहे. 

आयसीएमआरच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ (एनआयव्ही) आणि ‘भारत बायोटेक’ने (बीबीआयएल) मिळून कोव्हिक्सि‍सीन लस विकसित केली आहे. ही लस तयार करण्यासाठी ‘एनआयव्ही’ने कोरोनाची लागण झालेल्या; पण कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णाच्या शरीरातून कोरोना विषाणूचा स्ट्रेन वेगळा काढला. त्यानंतर हा स्ट्रेन ‘बीबीआयएल’ला पाठवण्यात आला. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या ‘बीएसएल -३ हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटी’मध्ये ही लस विकसित करण्यात आली. आतापर्यंत या लसीचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com