esakal | ‘चिमुकल्या’ मधमाशा हत्तींना रोखणार; ओडिशा सरकारचा अनोखा उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

‘चिमुकल्या’ मधमाशा हत्तींना रोखणार; ओडिशा सरकारचा अनोखा उपक्रम

‘चिमुकल्या’ मधमाशा हत्तींना रोखणार; ओडिशा सरकारचा अनोखा उपक्रम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भुवनेश्वर : हत्ती व मनुष्यातील संघर्षाने ओडिशापुढे आव्हान निर्माण केले आहे. हत्तींना मनुष्यवस्तीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी ओडिशा सरकारने मधमाशांची मदत घेण्याचे ठरविले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील अंगूल जिल्ह्यात अथमलिक वनविभागात ‘रिहॅब’ नावाचा हा प्रकल्प राबविण्यात येईल, अशी माहिती ओडिशाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) शशी पौल यांनी दिली.

हेही वाचा: कोरोना लसीच्या बूस्टर डोसची सध्या आवश्यकता नाही - Lancet Report

ओडिशामध्ये अलीकडच्या काळात हत्तीच्या हल्ल्यांत मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी होत आहे. त्यामुळे, राज्य सरकारचा वन आणि पर्यावरण विभाग आणि खादी व ग्रामोद्योग आयोगाने संयुक्तपणे हा प्रकल्प हाती घेतला. मधमाशांच्या मदतीने हत्तींना पिटाळून लावण्याचा असा प्रकल्प दक्षिण आफ्रिका तसेच उत्तराखंड, कर्नाटकमध्येही यशस्वी ठरला आहे. अथमलिक वनविभागाच्या परिसरातील तीन गावातील रहिवाशांसह यासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यात, गावकऱ्यांनी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले.

पौल म्हणाले, की सप्टेंबर ते मार्च या कापणीच्या हंगामात प्रामुख्याने हत्ती मनुष्यावर हल्ले करतात. त्यामुळे, या काळात हा प्रकल्प राबविला जाईल. यावेळी, हत्तीवर होणाऱ्या परिणामांचाही सरकारकडून अभ्यास केला जाईल. हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गज साथी योजनाही राबविण्यात येईल. यात स्वयंसेवकांना हत्तींच्या कळपाला पिटाळून लावण्यासाठी फटाके, बॅटरी व इतर उपकरणे दिली जातील.

हेही वाचा: मुलांच्या सार्वत्रिक लसीकरणाची अद्यापही शिफारस नाही - नीती आयोग

काय आहे प्रकल्प?

जंगलाच्या परिसरात तसेच सर्वधारणपणे हत्ती ज्या रस्त्याने मनुष्यवस्तीत शिरतात, त्या रस्त्यावर मधमाशांच्या पेट्या ठेवल्या जातील. त्याचप्रमाणे, या पेट्यांना वायर घट्ट बांधली जाईल. हत्ती या मार्गावरून जातील आणि या वायरवर पाय ठेवतील तेव्हा पेटी उघडेल. त्यातील मधमाशा हत्तींवर हल्ला करून त्यांना पुन्हा जंगलात माघारी पाठवतील. चंडका अभयारण्य, सिमिलीपाल राष्ट्रीय अभयारण्यातील हत्तींना बंगळूरमधील भारतीय विज्ञान संस्थेच्या मदतीने रेडिओ कॉलरही लावले जातील.

  • ओडिशात दहा वर्षांत हत्तींच्या हल्ल्यांत ठार व्यक्ती - ९००

  • गेल्या तीन वर्षांत मृत्यु झालेले हत्ती - २८२

loading image
go to top