भाजप शासित गोव्यात गोमांस तुटवड्याची मुख्यमंत्र्यांना चिंता; पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्नशील

टीम ई सकाळ
Friday, 18 December 2020

 सध्या जगभरात नाताळची तयारी सुरू झाली असून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात गोमांसाची कमतरता असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

पणजी - सध्या जगभरात नाताळची तयारी सुरू झाली असून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात गोमांसाची कमतरता असल्याची चिंता व्यक्त केली आहे. गोव्यात ख्रिसमसच्या दिवसांमध्ये गोमांसाची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. पण याच काळात गोमांसाचा तुटवडा असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. 

राज्यातील गोमांस पुरवठा वाढवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्यात गोमांसाचा तुटवडा असल्याची जाणीव असून ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही हालचाली करू असं त्यांनी सांगितलं. 

गोव्यातील मांस विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असून राज्यात गोमांसाला मागणी वाढत आहे. कर्नाटकात गोमांस तुटवडा असल्यानं गोव्यात देखील याची कमतरता जाणवत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. 

हे वाचा - भारतातील सर्वाधिक लग्न या पाच कायद्याअंतर्गत होतात, जाणून घ्या या कायद्यांविषयी

ऐन सणाच्या काळात गोमांस तुटवडा भासत असल्याची जाणीव गोवा सरकारला असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. लवकरच हा प्रश्न सोडवू आणि राज्यात मुबलक प्रमाणात गोमांस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

हे वाचा - सुंदरबनमध्ये व्याघ्रगणनेला सुरवात; कॅमेरा ट्रपिंग पद्धतीने वाघांची गणना

गोमांसाचा प्रश्न सोडवण्यासाठी पशुपालन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे असंही प्रमोद सावंत म्हणाले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार चर्चिल अल्मेडो यांनी राज्यात गोवा मीट कॉम्प्लेक्स लिमिटेडमध्ये कत्तलखाना पुन्हा सुरु करावा अशी मागणी केलीय. गेल्या पाच वर्षांपासून हा कत्तलखाना बंद आहे. इथं दिवसाला जवळपास 200 जनावरं मारण्याची व्यवस्था असल्याचंही अल्मेडो यांनी सांगितलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beef shartage in goa cm says govenment aware about that