काळा दिन ठरो एकीची नांदी...!

जितेंद्र शिंदे
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

ध्येय एकच असतानाही मराठी माणसांत दुही पाडून मतांचा गोळा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रीय पक्ष प्रयत्नशील आहेत. सीमालढा निर्णायक टप्प्यावर असताना हे खूप धोकादायक आहे. पण काळ्यादिनी मिळणारा प्रतिसाद पाहता यंदाचा काळा दिन मराठी माणसांच्या एकीची नांदी ठरो, अशी अपेक्षा लोकांतही आहे.

निर्धारित ध्येयासाठी सुरू असलेला लढा प्रदीर्घ काळ रेंगाळल्यानंतर चळवळीत काही प्रमाणात शिथिलता येते. अनेकदा तर संघटनाच लयास जाण्याची शक्‍यता अधिक असते. अशाच प्रकारे गेल्या ६२ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या सीमाचळवळीत अनेक स्थित्यंतरे आली. चौथ्या पिढीच्या खांद्यावर झेंडा आला तरी मनात आग तीच आहे, ध्येय तेच आहे. काळाच्या कसोटीवर खरे उतरत मराठी माणूस लढा देताना आजही दिसतोय. पण चळवळ बदलते तशी सामाजिक, राजकीय समीकरणेही बदलतात. प्रशासकीय पातळीवर जे शक्‍य नाही, ते राजकारणाच्या पटलावर होते. त्यामुळे ध्येय एकच असतानाही मराठी माणसांत दुही पाडून मतांचा गोळा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रीय पक्ष प्रयत्नशील आहेत. सीमालढा निर्णायक टप्प्यावर असताना हे खूप धोकादायक आहे. पण काळ्यादिनी मिळणारा प्रतिसाद पाहता यंदाचा काळा दिन मराठी माणसांच्या एकीची नांदी ठरो, अशी अपेक्षा लोकांतही आहे.

काळा दिन आणि महामेळावा दिनाबाबत दहा दिवसांपासून गावागावांत जनजागृती करण्यात येत आहे. केंद्र आणि कर्नाटक सरकारला सीमाभागातील मराठी भाषिकांची ताकद दाखविण्यासाठी हे दोन्ही लढे पुकारण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयात पक्षपाती भूमिका घेत केंद्र सरकार कर्नाटकची तळी उचलत आहे. ६२ वर्षांपूर्वीचा हा लढा आता इतिहासजमा झाला आहे, असा त्यांचा कांगावा आहे. त्याला कर्नाटकचे खतपाणी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करणारा हा युक्तिवाद खोडून काढण्यासाठी मराठी भाषिकांना काळा दिन आणि महामेळावा यशस्वीच करावा लागणार आहे. त्यासाठी लाखोंच्या संख्येने लोकांनी एकवटणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र एकीकरण समिती काम करत आहे. पण हे करत असताना दुभंगलेली मनेही पुन्हा जुळावीत, अशी आस सामान्य कार्यकर्त्यांना आहे.

पद आणि पैसा अशा कारणांमुळे संघटनेत फूट पडत असते. अशाच काही कारणांनी म. ए. समितीत दोन गट पडले आहेत. नासका आंबा पूर्ण करंडी खराब करतो, हे खरं आहेच. पण संघटनेशी प्रतारणा करणाऱ्यांबरोबर काही कार्यकर्तेही संघटनेतून दूर जाताहेत. त्याचा फटका संघटनेला बसतोय, याची काळजी नेत्यांना घ्यावी लागणार आहे. गेल्या आठ वर्षांपासूनही समितीत पडलेली दरी कमी होणे आवश्‍यक आहे. ज्यांनी संघटनेला नखे लावण्याचे काम केले, त्यांना जनता माफ करणार नाही. पण त्यांच्या बोलण्यावर भाळून जे कार्यकर्ते मुख्य प्रवाहापासून दूर गेलेत, त्यांना परत आणण्यासाठी नव्याने काम करावे लागणार आहे.

म. ए. समितीत पडलेली फूट निष्ठावंतांची दुखरी बाजू आहे. दोन्ही गट एकत्र येऊन मराठी माणसांची ताकद वाढवावी, अशी अपेक्षा त्यांची आहे. युवा वर्गही यासाठी आग्रही आहे. काही गावांत याबाबत जागृती सुरू आहे. पण एकीची प्रक्रिया ठरविताना निष्ठा, निस्वार्थपणा आणि योगदान याबाबतही विचार होणे आवश्‍यक आहे. अन्यथा विरोधकांपेक्षा आपल्यातीलच फितुरांमुळे संघटनेला मोठा बाधा पोचण्याची भीती अधिक दिसून येते. त्यामुळे काळ्या दिनानिमित्त निघणारी विराट फेरी दुभंगलेली मने जोडणारी नांदी ठरावी.

युवावर्गाची भूमिका महत्त्वपूर्ण
गतवर्षी काळ्या दिनाच्या फेरीस युवावर्गाचा मोठा सहभाग होता. राष्ट्रीय पक्षांसाठी ती धोक्‍याची घंटा होती. यंदाही युवावर्ग सक्रिय आहे. आगामी काळात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे अनेकजण सभेतील सहभागावर समितीच्या यशापयशाचा अंदाज बांधणार आहेत. काही पक्ष समिती खिळखिळी करण्यासाठी युवावर्गाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. समितीतील नेत्यांचा वादही बऱ्यापैकी राष्ट्रीय पक्षांनी लावलेली फूस असल्याचे अनेकदा दिसून येत आहे. त्यामुळे समितीच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून यापुढील काळात समिती नेत्यांना आपापसातील वाद बाजुला सारून संघटनेच्या हितासाठी एकत्र येणे आवश्‍यक आहे.

Web Title: Belgaum News Black Day special story