कर्नाटकात घरबसल्या मिळेल जात, उत्पन्न, रहिवासी दाखला

विनायक जाधव 
बुधवार, 31 जानेवारी 2018

बेळगाव - जात, उत्पन्न आणि रहिवासी प्रमाणपत्रांसाठी यापुढे तलाठी, महसूल निरीक्षक किंवा तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. ही प्रमाणपत्रे आता घरबसल्या मिळणार आहेत. महसूल खात्याने प्रमाणपत्र वितरणासाठी ऑनलाईन सेवेचा प्रारंभ केला असून घरबसल्या किंवा सायबर कॅफेमधून अर्ज केल्यास अर्जदाराला ऑनलाईन प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.

बेळगाव - जात, उत्पन्न आणि रहिवासी प्रमाणपत्रांसाठी यापुढे तलाठी, महसूल निरीक्षक किंवा तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. ही प्रमाणपत्रे आता घरबसल्या मिळणार आहेत.

महसूल खात्याने प्रमाणपत्र वितरणासाठी ऑनलाईन सेवेचा प्रारंभ केला असून घरबसल्या किंवा सायबर कॅफेमधून अर्ज केल्यास अर्जदाराला ऑनलाईन प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. सर्व्हे सेटलमेंट आणि लॅंड रेकॉर्डस्‌चे संचालक मुनीष मौदगील यांनी याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.

असे मिळणार प्रमाणपत्र 
ऑनलाईन अर्ज करताच आता प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. यासाठी ‘www.nadakacheri.karnataka.gov.in’ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तिथे असलेल्या ‘aply ONLINE’ बटणावर क्‍लिक करायचे आहे. त्यानंतर आपले नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता यांची माहिती अपलोड करायचे आहे. तसेच आपल्याकडील एखाद्या वैध ओळखपत्राचा क्रमांक (आधार किंवा निवडणूक कार्ड) व स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. यानंतर ऑनलाईन पद्धतीने १५ रुपये शुल्क जमा केल्यास जात, उत्पन्न किंवा रहिवासी प्रमाणपत्र संकेतस्थळावर उपलब्ध होईल. हे प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेता येणार असून ते वैध असणार आहे.

वर्षभरापूर्वीपासूनच या ऑनलाईन प्रक्रियेसाठी कुटुंबांची माहिती जमविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सहा महिन्यापूर्वी बेळगावात ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी तहसील कार्यालयात ओटीएफ मशिनही मागविण्यात आली होती. मात्र, ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात झाली नव्हती. ऑनलाईन अर्ज केल्यास प्रमाणपत्र संकेतस्थळावरून तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी वर्षभरापूर्वीच तलाठ्यांनी गावातील सर्व कुटुंबांची वैयक्तिक माहिती जमविली होती. ही माहिती शासनाच्या सर्व्हरवर उपलब्ध करून देण्यात आली असून प्रमाणपत्रासाठी अर्ज करताच ऑनलाईन पद्धतीने अर्जदाराला त्याचे प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.

शाळा प्रवेश, नोकर भरती आदी कारणासाठी दरवर्षी सुमारे दोन लाख अर्ज बेळगाव तहसील कार्यालयाकडे जमा होतात. जनस्नेही केंद्रात अर्ज केल्यानंतर तेथून संबंधित अर्ज तलाठ्याकडे द्यावा लागतो. तलाठी अर्जदाराच्या उत्पन्नाची आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अर्ज पुढील प्रक्रियेसाठी महसूल निरीक्षकांकडे पाठविला जातो. तेथील पडताळणीनंतर अर्ज तहसील कार्यालयाकडे पाठविला जातो. तेथे पुन्हा पडताळणी झाल्यानंतर तहसीलदार प्रमाणपत्र मंजूर करतात. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागतो. या प्रक्रियेत एजंटराजही वाढल्याने अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, या सर्व गोष्टींना आता आळा बसणार आहे.

Web Title: Belgaum News cast, domicile certificate available online