तीन राजवटींची साक्षीदार इतिहासजमा

तीन राजवटींची साक्षीदार इतिहासजमा

खानापूर - पोर्तुगीज, इंग्रज या परदेशी राजवटींसह स्वातंत्र्योत्तर लोकशाहीची साक्षीदार असलेल्या कॅसलरॉकमधील मराठी शाळेच्या स्थापनेला यंदाच सव्वाशे वर्षे पूर्ण झाली. पण, शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातच या शाळेला टाळे ठोकण्याचे काम कर्नाटक सरकारने केले आहे. पोर्तुगीज आणि इंग्रजांनीही या शाळेचे माध्यम बदलण्याचे धाडस केले नव्हते. ते कर्नाटक सरकारने केले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात महाजन आयोगाने शिफारस केलेल्या तत्कालीन सुपा (आताचा जोयडा) तालुक्‍यातील ६९ गावांपैकी महत्वाचे गाव म्हणजे कॅसलरॉक. आधी या गावात पोर्तुगीजांचे ठाणे होते. तत्पूर्वी काही काळ इंग्रजांचा अंमल होता. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गावात २६ जून १८९३ रोजी मराठी शाळेची स्थापना झाली. दोन वर्षांपूर्वी या शाळेला कन्नडसक्तीचा फटका बसला. कारवार जिल्ह्यात कानडीकरणाचा वरवंटा फिरुन दोन दशके उलटली. पण, कॅसलरॉकमधील मराठी शाळा बंद करण्यासाठी २०१६ वर्ष उजाडावे लागले.

शाळेत सुमारे २०० मराठी विद्यार्थी शिकत होते. तरीसुद्धा ही शाळा अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे, मराठी भाषिक विद्यार्थ्यांना नाईलाजाने कन्नड शाळेत प्रवेश घ्यावा लागला आहे. शाळाच बंद केल्याने जुनी इमारत मोडकळीस आली असून चोहोबाजुंनी झुडपे वाढली आहेत. कॅसलरॉक गावातील संस्कृती मराठी आहे. गावात मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही आहे. पण, संपूर्ण गावाचे कानडीकरण झाल्याचे गावातील दुकाने, शासकीय कार्यालये आणि आस्थापनांवरील नामफलकांवरुन दिसून येते.

गावात पूर्वीपासून मराठी शाळा होती. पटसंख्या कमी असल्याच्या कारणास्तव ही शाळा अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे, मुलांना नाईलाजास्तव कन्नड शाळेत पाठवावे लागले. आम्हाला कन्नड समजत नसली तरी मुले कन्नड बोलतात. घरात मराठी बोलत असली तरी घराबाहेरील सगळे व्यवहार कन्नडमधूनच होतात.
- गणू गावकर,
स्थानिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com