भष्ट्राचारामुळे तुरूंगात गेलेल्यांकडून स्वार्थासाठी रॅली - सिद्धरामय्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

चिक्कोडी - सत्तेवर असताना जनता व राज्याचा विकास करण्याचे सोडून भ्रष्टाचार करुन त्या आरोपाखाली तुरूंगाची हवा खाल्लेल्या भाजप नेत्यांनी जनतेसाठी नव्हे तर स्वार्थासाठी परिवर्तन रॅली काढली आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारच्या स्वच्छ कारभारावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याची त्यांची नैतिकता नाही. भाजप नेत्यांकडून होणाऱ्या आरोपांचा सामना करण्यास आपण सज्ज असून त्यात सत्त्यता आढळल्यास एकाच व्यासपीठावर येण्याचे आव्हान मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केले. 

चिक्कोडी येथे जीटीटीसी प्रशिक्षण केंद्र व चिक्कोडी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या उदघाटन समारंभात ते बुधवारी (ता. 22) बोलत होते. ते म्हणाले, "बेळगावला अधिवेशन भरवून उत्तर कर्नाटकातील समस्या सोडविण्यासाठी चर्चा करण्यात येत आहे. खासदार हुक्केरी यांच्यामुळे चिक्कोडी लोकसभा व चिक्कोडी- सदलगा विधानसभा मतदार संघ विकासात पुढे आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात पाटबंधारे खात्याकडून 55 हजार कोटीचा खर्च करण्यात आला. भाजपचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, माजी मंत्री कट्टा सुब्रमण्यम नायडु, जनार्दन रेड्डी, हालाप्पा, कृष्णाप्पा शेट्टी यांनी काय केले? हे सांगावे. दरवर्षी शेतकऱ्यांना पाणी योजनांसाठी आपण घोषणा केल्याप्रमाणे साडेचार वर्षात 40 हजार कोटी खर्च केले असून आणखी 15 हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत.'

राज्यातील 1.08 कोटी कुटुंबे व 4 कोटी नागरिकांना मोफत रेशन देण्यात येत आहे. देशातील 16 राज्यात भाजपचे सरकार असूनही तेथे ही योजना का राबविली नाही? शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करायचे होते. पण केंद्राने पाठ फिरविल्याने 50 हजाराचे कर्ज माफ केले. त्यामुळे भाजप नेत्यांना शेतकऱ्यांचा कळवळा येणे हे नाटकी आहे. म्हादाई प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कर्नाटकासह महाराष्ट्र व गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समझोता करण्याची गरज आहे. पण यासाठी पंतप्रधानांना भेटूनही त्यांनी पुढाकार घेतलेला नाही. शिवाय दोन राज्यात भाजपाचे सरकार असल्याने तेच यासाठी अडथळा बनत असल्याचा आरोपही सिध्दरामय्या यांनी केला.

भाजप नेत्यांनी काँग्रेसमुक्त कर्नाटकाची घोषणा केली असली तरी आपण भूकमुक्त कर्नाटक, निरक्षरतामुक्त कर्नाटक, भयमुक्त कर्नाटक निर्माण करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. राज्यातील काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या 165 पैकी 155 आश्‍वासनांची पूर्तता केली आहे, असे ते म्हणाले. 

यावेळी पाटबंधारे खात्याचे मंत्री एम. बी. पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एच. सी. महादेवप्पा, खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी यांच्यासह चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: Belgaum News Chief Minister Sidharamayya comment