मराठी वृत्तपत्रांवर कारवाई करण्याचा बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

येळ्ळूर येथे जय महाराष्ट्र फलकावरून पोलिसांनी मराठी जनतेला अमानवी वागणूक दिली. घरात घुसून पुरूष, महिला, वृध्द आणि बालकांनाही मारहाण केली. या घटनेची गंभीर दखल घेत मराठी वृत्तपत्रांनी सविस्तर वृत्तांकन केले होते. त्यामुळे कर्नाटक पोलिसांची देशपातळीवर नाचक्‍की झाली होती. त्यामुळेच भास्कर राव यांनी मराठी वृत्तपत्रांवर कारवाईचा इशारा दिला होता. त्याच नैराशातून आता जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी मराठी वृत्तपत्रांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

बेळगाव : जिल्हाधिकारी एन. जयराम यांचा मराठीव्देष पुन्हा उफाळून आला असून आता चक्‍क मराठी वृत्तपत्रांवर कारवाई करण्याचे वक्‍तव्य त्यांनी केले आहे. मराठी वृत्तपत्रांमुळे सीमाभागातील वातावरण कलुषित होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चातील मागण्यांचे निवेदन घेतल्यानंतर ते कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. जयराम म्हणाले, "वितरण वाढविण्यासाठी मराठी वृत्तपत्र मराठी आणि कन्नड भाषकांत तेढ निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसिध्द केल्या जात आहेत. समाजाच्या दृष्टीने ते चुकीचे असून मराठी प्रसार माध्यमांनी वास्तव मांडावे. अन्यथा वृत्तपत्रांवर कारवाई करावी लागेल.'' 
माणसांच्या हक्‍काच्या लढ्यात मराठी वृत्तपत्रांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सरकार, प्रशासनाकडून होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला वाचा फोडली आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी एन. जयराम यांचा मराठीद्वेष उफाळून आला आहे. सीमाप्रश्‍नाच्या लढ्याला चालना देण्याचे काम मराठी वृत्तपत्रांतून होत असल्यामुळे प्रशासनाकडून कारवाईची भाषा बोलली जात आहे. 

सुमारे अडीच वर्षांपूर्वी उत्तर विभागाचे तत्कालिन पोलिस महानिरीक्षक भास्कर राव यांनीही मराठी वृत्तपत्रांवर कारवाईची भाषा केली होती. येळ्ळूर येथे जय महाराष्ट्र फलकावरून पोलिसांनी मराठी जनतेला अमानवी वागणूक दिली. घरात घुसून पुरूष, महिला, वृध्द आणि बालकांनाही मारहाण केली. या घटनेची गंभीर दखल घेत मराठी वृत्तपत्रांनी सविस्तर वृत्तांकन केले होते. त्यामुळे कर्नाटक पोलिसांची देशपातळीवर नाचक्‍की झाली होती. त्यामुळेच भास्कर राव यांनी मराठी वृत्तपत्रांवर कारवाईचा इशारा दिला होता. त्याच नैराशातून आता जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी मराठी वृत्तपत्रांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

मराठी कागदपत्रे, भाषिक अल्पसंख्याक आयोग, उच्च न्यायालयातील निकाल आणि जय महाराष्ट्रवरून पेटलेल्या वादामुळे जिल्हाधिकारी जयराम यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळेच त्यांनी मराठी वृत्तपत्र विपर्यास्त वृत्त प्रसिध्द करून मराठी व कन्नड लोकांत विस्तुष्ट निर्माण करत असल्याचा आरोप करत कारवाईचा इशारा दिला आहे. 

तपासणी करणार 
एकीकरण समितीच्या मोर्चात जय महाराष्ट्राचा गजर करण्यात आला. जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यास येतानाही जय महाराष्ट्रच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे पित्त खवळलेल्या कन्नड पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना जय महाराष्ट्र म्हणणाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्‍न विचारला. त्यावर पोलिसांनी कोणत्या अटींवर मोर्चाला परवानगी दिली होती. त्या अटींचे उल्लंघन झाले का, याची तपासणी करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी जयराम यांनी सांगितले. 

Web Title: belgaum news district collector vows action against marathi newspapers