गाईंची विक्री कवडीमोल दराने

राजेंद्र हजारे
गुरुवार, 21 जून 2018

निपाणी - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासह (गोकुळ) इतर संघांनीही गाईंच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपया कपात केली आहे. त्यामुळे सीमाभागात संकलित होणारे १ लाख ३० हजार लिटर दूध संकलन ठप्प झाले असून शेतकरी आपल्या गाईंची विक्री करीत आहेत. 

निपाणी - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासह (गोकुळ) इतर संघांनीही गाईंच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपया कपात केली आहे. त्यामुळे सीमाभागात संकलित होणारे १ लाख ३० हजार लिटर दूध संकलन ठप्प झाले असून शेतकरी आपल्या गाईंची विक्री करीत आहेत. 

गायींची कवडीमोल दराने खरेदी होत असून आठवडाभरात ७०० पेक्षा अधिक गाईंची विक्री झाली आहे. दूध संघांनी घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने घातक बनला आहे. 
या निर्णयाविरोधात आठवड्यापूर्वी मुगळीतील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून निषेध केला. पण त्याचा काही परिणाम न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे गाई विकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही. ५० हजाराची गाय केवळ २५ ते ३० हजारात विकली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. 
गोकूळमध्ये दररोज सुमारे ११ लाख लिटर दूध संकलन होते. त्यामध्ये ६ लाख ५० हजार लिटर गाय तर ४ लाख ५० हजार लिटर म्हशीचे दूध आहे. सांगली, कोकण व्यतिरिक्त सीमाभागातून सुमारे १ लाख ३० हजार लिटर गाईचे दूध जात असताना संघाच्या निर्णयामुळे सीमाभागातील दूध उत्पादक हतबल झाले आहेत. 

पशुखाद्याचे दर, त्या तुलनेने दूधाला मिळणारा दर यांचा ताळमेळ लागत नसताना अनेक शेतकऱ्यांनी गोठा प्रकल्प करून गाईच्या दुधाचे मोठे उत्पादन घेतले आहे. सीमाभागातील विविध मठांमध्ये गाईंचे संगोपन करण्यासह मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जात आहे. पण संघाने दूध नाकारल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे.

गोकूळ दूध संघाने सीमाभागातील केवळ ३० टक्केच गाय दूध घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उर्वरीत दुधाचे काय करायचे, असा प्रश्न पडला आहे. या भागातील नेत्यांनी दूध संघांशी चर्चा करून उत्पादित होणारे सर्व दूध घेण्याची विनंती संघाला करावी.
- सचिन पाटील, दूध उत्पादक शेतकरी, निपाणी 

सध्या महाराष्ट्रातील गाईचे दूध वाढल्याने आणखी दूध घेतल्यास संघ अडचणीत येणार आहे. त्यामुळे संघाने सीमाभागातील दूध नाकारले आहे. अशा आशयाचे पत्रक गोकुळने स्थानिक दूध संकलन केंद्रांना दिले आहे.
- अरुण देशिंगे, दूध संकलक, बेनाडी

Web Title: Belgaum News fall in Cow rate