वाघमारेला फिरवले खानापूर जंगलात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

अलीकडेच महाराष्ट्र पोलिसांनी खानापूर पोलिस स्थानकाला भेट देऊन काही ठिकाणांची माहिती घेतली असल्याने वाघमारेला खानापूर तालुक्‍यातील जंगल भागात फिरविल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

बेळगाव, खानापूर - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारेला बुधवारी (ता. २०) बेळगावला आणले होते. येथील जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करून गुप्तस्थळी नेले; परंतु एसआयटीने त्याला खानापूर तालुक्‍यातील जांबोटीच्या जंगलात फिरवून पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण नेमके कुठे देण्यात आले? शिवाय खानापूरच्या सीमेवरील रामनगर (जि. कारवार) परिसरातही त्याला घेऊन गेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अलीकडेच महाराष्ट्र पोलिसांनी खानापूर पोलिस स्थानकाला भेट देऊन काही ठिकाणांची माहिती घेतली असल्याने वाघमारेला खानापूर तालुक्‍यातील जंगल भागात फिरविल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

धारवाडमधील ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर बेळगावसह खानापूर तालुका चर्चेत आला. यापूर्वी गौरी लंकेश हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रवीणकुमारने त्याच्या जबाबात बेळगाव व खानापूरचा उल्लेख केला होता. 

खानापूर जंगल भाग रडारवर
डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर कर्नाटक सीआयडीच्या तपासात काही मोबाईल क्रमांक दोन्ही ठिकाणी वापरल्याचे समोर आले होते. त्यानंतर सीआयडीने खानापूर तालुक्‍यात तपासाची चक्रे फिरविली. मात्र, त्यावेळी त्यांच्या हाती काहीच लागले नाही. आता ज्या भागात प्रवीणकुमारला फिरविण्यात आले होते, त्याच भागात वाघमारेलाही फिरविण्यात आल्याने तपास यंत्रणांच्या रडारवर खानापूरचा भाग असल्याचे स्पष्ट होते.

वाघमारेने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण बेळगावात मिळाल्याचे म्हटले आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार खानापूर तालुक्‍यातील जंगलात प्रशिक्षण घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी व आज सकाळी त्याला जांबोटी भागातील जंगलात फिरविण्यात आले. यानंतर दुपारी त्याला रामनगर भागातही नेण्यात आले. खानापूर तालुक्‍याच्या सीमेवर व कारवार जिल्ह्यातील रामनगर परिसरातही एसआयटी पथक त्याला घेऊन गेले होते. येथे परिसरात त्याला पोलीस फिरवत असल्यामुळे त्याने याच भागात पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याच्या वृत्ताला बळकटी मिळत आहे. 

एसआयटीबाबत स्थानिक यंत्रणा अनभिज्ञ
गेल्या तीन दिवसांपासून बंगळूरहून आलेले एसआयटीचे पथक बेळगाव परिसरात फिरत आहे. यामध्ये सीआयडीचे पोलिस उपमहानिरीक्षक, एसआयटीचे दोघे उपअधीक्षक, चार पोलिस निरीक्षक, काही उपनिरीक्षक यांच्यासह त्यांचे अन्य सहकारीही आहेत. परशुराम वाघमारेला सोबत घेऊन त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे विविध ठिकाणी फिरून माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे; परंतु याबाबतची माहिती स्थानिक पोलिस यंत्रणेला लागू दिलेली नाही. बुधवारी सायंकाळी त्यांनी परशुराम वाघमारेची नियमित वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालयात केली तेव्हा पथक बेळगावात असल्याचे स्पष्ट झाले. 
 

Web Title: Belgaum News Gouri Lankesh Murder case Investigation