हेलिकॉप्टरने येऊन येडींविरोधात विद्यार्थांचा अर्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

बंगळूर - येडियुरप्पा यांच्याच स्टाईलने थेट हेलिकॉप्टरने येऊन एका विद्यार्थ्याने शिकारीपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांनाच थेट आव्हान दिले.

बंगळूर - येडियुरप्पा यांच्याच स्टाईलने थेट हेलिकॉप्टरने येऊन एका विद्यार्थ्याने शिकारीपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांनाच थेट आव्हान दिले.

विद्यार्थी संघटनेचा राज्याध्यक्ष के. सी. विनय राजदत्त असे त्याचे नाव आहे. रविवारी (ता. २२) सकाळी हेलिकॉप्टरने येऊन अपक्ष उमेदवार म्हणून त्याने शिकारीपूर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. येडियुरप्पा हे उमेदवारी दाखल करण्यासाठी बंगळूरहून हेलिकॉप्टरने आले होते, म्हणून त्यानेही तीच स्टाईल वापरली.

हेलिकॉप्टरने आलेल्या विनयचे त्याच्या मित्रांनी म्हैसूर फेटा व हार घालून स्वागत केले. सद्य:स्थितीत येडियुरप्पा शिकारीपूरला हेलिकॉप्टरने येतात. येडियुराप्पांप्रमाणे विनयने सुध्दा हेलिकॉप्टरने यावे, असा आग्रह त्याच्या मित्रांनी केला. म्हणून पैसे गोळा करून हेलिकॉप्टर भाडेकराराने घेतले. मित्रांच्या सहकार्याने हेलिकॉप्टरने येऊन हुच्चुरायस्वामी देवस्थानात त्याने पूजा करून उमेदवारी अर्ज दाखल केला.

विनय शिमोगा जिल्ह्यातील कुंचेनहळ्ळी गावचा रहिवासी आहे. सह्याद्री महाविद्यालयाचा तो पदवीधर असून, तो सध्या बंगळूरमध्ये राहतो. राज्य विद्यार्थी संघाचा तो अध्यक्ष आहे. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध आंदोलनांत त्याने भाग घेतला आहे. त्याचे वडील पोलिस खात्यात सेवा बजावतात. विनयला अभिनयाची आवड आहे. ‘रामदुर्ग’ नावाच्या चित्रपटात त्याने अभिनेत्याची भूमिका केली आहे. त्याच्या गावात त्याची पाच एकर शेती आहे.

Web Title: Belgaum News Karanataka Assembly Election